धडाडीबाज प्रबोधनकार

- वासुदेव सीताराम बेंद्रे

प्रबोधनकारांच्या पंच्च्याहत्तरीनिमित्त अनेक नामवंतांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. प्रबोधकारांचा धडाडीबाज जीवनप्रवास थोडक्यात उलगडवून दाखवणारा हा लेख आहे, पुण्यातील लेखक वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा. तो समाजसेवा अंकाच्या प्रबोधनकार ठाकरे विशेषांकात छापला गेला होता.

...

 जन्मतःच दरिद्र्याच्या पकडींत सांपडल्यास बालपणीहि मनावर होणारे आघात मनुष्याच्या बुद्धीला आणि प्रकृतीला विशिष्ट प्रकारचें वळण लावण्यास कारणीभूत होतात. कार्यावरील कट्टर निष्ठा, बुद्धीला तीव्रतर संवेदना देण्याची सवय, जबाबदारीबाबत पापभिरू जागृति, लेखन-हुन्नर-कलासुरकींत, निर्भयता, उपेक्षिलेल्यांच्या उत्क्रांतिसाठीं उत्सूर्त भावना आदि गुणांना जशी गरिबी व बालपणांतील आबाळ बालमनांत दृढतेनें ठाव देऊं लागते, तशीच या दरिद्र्यामुळें बुद्धीची वाढ व साफल्यता यांत हरघटकीं भोगावी लागणारी निराशा आणि समाजाकडून मिळणा-या विषम वागणुकीमुळें बुद्धिविकासाला पडणारी मुरड हींच त्या माणसांच्या वृत्तींना वयाबरोबर तिखट मनोर्मीची जोड करून देतात. 

अशा मनस्थितींत जर चित्ताला स्थिरता देणारी पण चिरकाल टिकणारी, घटना कालवशात घडून न आली तर थोर बुद्धिवादी, हुन्नरबाज, कर्तृत्वशाली किंवा लोकहितवादी माणसांचे जीवनहि स्वार्थापरार्थाबद्दल तितकेंच बेदरकारी बनतें. नैराश्यात उद्भवणारी कठोर बेदरकारी प्रवृत्ति त्यांच्या माणुसकीच्या जिव्हाळ्याला रुक्षता आणते आणि सुदैवाने परिस्थिती बदलून निरावादांतून मोकळीक होईपर्यंत अशा दुर्दैवी माणसांना समाजापासून अलिप्त राहाण्याची पाळी येते. परंतु या दैवापत्तींतून मुक्तता होतांच तीच जनता त्याच माणुसकीच्या जिव्हाळ्याची खरी पारख करते व आपुलकीच्या शुद्ध भावनेनें त्या व्यक्तीशी समरस पावते. प्रबोधनकार ठाकरेंच्या आयुष्यांतील घडामोडींचे छायाचित्र अशाच स्वरुपांत मिळत असलें तर नवल कसले?

श्री. ठाकरे यांचे वडिल साधे तालुका कोर्टाचे बेलिफ होते. या गरिबीतहि श्री. ठाकरेंना आपलें बालपण आबाळींत, परंतु कौंटुबिक सुखासमाधानानें काढतां आलें. शेजारीपाजारी आप्तेष्ट मंडळीकडून धार्मिक व सामाजिक उत्सवमहोत्सवांत कराव्या लागणा-या कलाकुसरीच्या कामांत त्यांना शाबासकी मिळविली. शाळेंतील हुशार व कलावंत विद्यार्थी म्हणून मान्यता मिळविली, इतकेंच नव्हे तर आपल्या चौकसपूर्ण प्रारंभीच्या वाचन-लेखन-विवेचन-चिकित्सेनें पनवेल येथील शाळाधिका-यांबरोबर तेथील केरळ कोकिळाचे नामवंत संपादक कै. आठल्ये यांचीहि मर्जी संपादून घेतली होती. 

कदाचित या ''केरळ कोकिळ'' संस्थेशी आलेला संबंधच श्री. ठाकरे यांची लेखनव्यवसायाकडे विशिष्ठ प्रवृत्ति होण्यास बिजरूपानें कारण झाली म्हटलें तर चूक होणार नाही. त्यामुळे त्यांची बुद्धिवादी कार्यातील कर्तृत्वाची जाणीव अधिक दृढ होऊं लागली, आणि श्री. ठाकरेंना बुद्धिविकासाला चांगलाच वाव मिळणार अशी सुखस्वप्नें पडूं लागली. परंतु त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनें त्यांना पनवेल सोडून एका कुटुंबाच्या आश्रयानें जाऊन राहावें लागलें. नवीन वातावरण जरि परिचित व आवडीचें होतें तरी पनवेलला बसलेली बैठक विस्कटली गेली. 

त्यांत परावलंबनाची जाणीव परिस्थितीमुळें तीव्रतेनें भासण्याइतका त्यांचा मनाला समजुतदारपणा आला होता. अर्थातच त्यांच्या शिक्षणाकांक्षेला व बुद्धिविकासाच्या मार्गांना मुरड घालण्याची पाळी आली. लेखनकलेच्या पहिल्या दालनांत प्रवेश होतांच पुढचा पडदा पडला. एक दोन वर्षांतच देवासचा आश्रय करावा लागला. तेथें कसेंबसें माध्यमिक शिक्षणाच्या तडीला लागतात तोंच, पैशाच्या अभावीं तयारी होऊनहि, तत्कालीन सरकारी नोकरीच्या एकमेव धंदा-रोजगारीच्या पात्रतेच्या शिक्यामोतंबाला मुकावें लागले. जीवनाच्या पुढच्या अवकाशांत श्री. ठाकरेंना दारिद्र्याच्या परिस्थितीशी झगडा देतांना ही दुर्बळता बरीच जाणवली.

आयुष्याच्या नव्या टप्यांत पदार्पण करितांना श्री. ठाकरेंना तत्कालीन परिस्थिती व जीवनाची चाकोरी तितकीशी उपकारक नव्हती. कारण यतिविहीत धंदारोजगारी ठरीव साच्याची व ठरीव मामल्याची होऊन राहिली होती. लेखनव्यवसाय हें कांही आर्थिक प्राप्तीचें साधन नव्हतें. श्री. ठाकरेंना तत्कालीन जाती-जातींच्या चढाओढींत एकच आणि तेंहि मर्यादित असें क्षेत्र मोकळें होतें आणि तें म्हणजे सरकारी नोकरीचें. परंतु त्यास आवश्यक अशी शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधीच त्यांना मिळूं शकली नव्हती. अशा परिस्थितींत कामधंद्याचे क्षेत्र मुंबई हेंच सर्वांना माय पोट होते. श्री. ठाकरे मुंबईस आले, परंतु मुंबईसारख्या बकाली वस्तींत त्यांना स्वजातीय निराधार उमेदवारांच्या एका गटाच्या आश्रयास जावें लागलें आणि श्री. ठाकरेंच्या जीवनाला जी स्थिरता लाभणें जरूर होतें. त्याऐवजी त्यांना अस्थिर वृत्तीच्या मित्रगणांत रमावें लागलें. याहि स्वैराचारियांत त्यांनी आपल्या बुद्धीची तडफ दाखविली. त्यांच्या गटाच्या दैनंदिनीवरून नाथमाधवा सारख्या चांगल्या कादंबरीकाराला, एक, जरा अतिशयोक्तीनें, लोकरंजन करण्याजोगे संविधानक मिळूं शकले. येथून ते नाटकमंडळींत शिरले. तेथें त्यांना आपल्या चित्रकलेचा व सुबक मांडणींतील कसबाचा चांगला उपयोग करून दाखवितां आला. कांही दिवस त्यांनी ग्रामोफोन रेक- र्डस् ऐकवूनहि गुजराणा केला. श्री. ठाकरेंच्या आयुष्याचा हा कालखंड ज्या प्रवाहांत सांपडला त्यांत त्यांच्या रक्तांत बीजरुपानं रुजून राहिलेल्या लेखनकलेला किंवा चित्रकलेला सकस संजीवन मिळणें दुरापास्त होतें.

अशा परिस्थितींतहि त्यांना सतार, संगित, चित्रकला यांचा अभ्यास करितां आला. वाचन चालूं होते आणि मोठमोठ्या विद्वानांचेंहि सानिध्य लाभत होते. प्रवासहि बराच झाले, परंतु या कालखंडातील चार पांच वर्षांत झालेले त्यांच्या मनावरील संस्कार त्यांच्या बुद्धिविकासाच्या प्रगतीला तितकेसे परिपोषक झाले नाहींत. कदाचित त्यांच्या जीवनांत शिरलेले संगतीचे दोष कायम जडून राहिले. या ''भटक्या जीवनाची'' इतिश्री त्यांचे अमरावतीस लग्न होतांच झाली आणि श्री. ठाकरे आपल्या सर्व कुटुंबासह स्थिर जीवनाच्या क्षेत्रांत स्थायीभूत होण्याच्या निश्चयानें दादरला येऊन राहिले. या कालखंडात श्री. ठाकरे यांनी ''धृव'', ''मंगलतारा'' व आणखी एक अशी तीन नाटकें लिहिली. परंतुती अप्रकाशितच राहिलीं. मात्र इ. स. १९१८ च्या सुमारास लिहिलेला ''वक्तृत्वशास्त्र'' हा ग्रंथ चित्रशाळेनी छापून प्रसिद्ध केला आणि नंतर त्याचा बराच बोलबालाहि झाला. 

श्री. ठाकरे यांस प्रथम राम एजन्सी व एडलर टाइपरायटरचे एजंट म्हणून व नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे ऑफिसांत नोकरी होती. त्यामुळें त्यांची दादरला दहा बारा वर्षे गेली. या कालखंडांतील त्यांचा बराच काल मित्रांबरोबरील सामाजिक कार्यांत आणि विशेषेंकरून सतार वादनांत जात असे. त्यांच्या निवासस्थानांत सर्व वर्णीय संगितज्ञांचा एक लहानसा संचच जमला होता. जलशाचे कार्यक्रम नेहमीं होत. वाचन लेखनाचा नाद कायमच होता. शॉर्टहँडचा अभ्यास केला. परंतु येथें त्यांस मूळव्याधीच्या व्यथेपासून पुष्कळच त्रास होऊं लागला आणि ही व्यथा त्यांच्या आयुष्याची निरगट्ट सोबतीण होऊन बसली आहे. ही सोबतीण त्यांचे रक्त अक्षरशः इतकें सारखें अखंड शोषित असते कीं ते तिला कशी साहूं शकतात आणि तिच्या कटकटींत रात्रंदिवस काम करण्यास निवांत कसें राहूं शकतात यांचें सर्वांनाच आश्चर्य वाटतें. त्यांचि पिंडच कार्यनिष्ठेबाबत अति कणखर असल्यानें त्यांना जशी मानवी शक्तीची पर्वा नसते तशीच ते शारिरीक वेदनांबद्दल बेफिकीर राहूं शकतात. श्री. ठाकरेंच्या रोजच्या बोलण्याचालण्यावरून पुष्कळ लोकांना त्यांच्या मैत्रीतील निष्ठेबद्दल शंकाच वाटते. परंतु त्यांचे मित्र फार नसतात आणि त्यांनी एकदां कां कोणाला आपला मित्र म्हणून मानलें, कीं ती मैत्री अखंड व अढळ राखण्याची त्यांची प्रवृत्ति असते, हें नंतर लक्षांत आल्यावाचून राहात नाहीं.

या कालखंडांत त्यांनी आपल्यावरील पुष्कळच कौटुंबिक व सामाजिक जबाबदा-या पार पाडल्या. ही कौटुंबिक जबाबदारी तर फारच मोठी होती. त्यामुळें त्यांचे वास्तव्य जरी दादरला स्थिर झालें होतें तरी त्यांची दैनिक विवेचना त्यांच्या मनाला स्थिर होऊ देत नव्हती. परंतु श्री. ठाकरे इतर बाबतींत जरी चंचल आकांक्षावादी असले तरी या कौटुंबिक संसारक्षेत्रात स्थितप्रज्ञ असतात. संसाराच्या धकाधकींत लेखनाकडे फारसें लक्ष राहिलें नव्हतें. 

परंतु राजवाडे प्रकरणी वाद सुरू होतांच त्यांनी प्रथम ''कोदंडाचा टणत्कार'' व नंतर ''ग्रामण्यांचा इतिहास'' अशी दोन पुस्तकें प्रसिद्ध करून वर्णश्रेष्ठतेच्या अभिमानी वृत्तीला निर्धास्त तोंड देण्याची प्रवृत्ति ब्राह्मणेतरांत अंकुरीत केली. त्यामुळें त्यांची ही दोन पुस्तकें फार गाजलीहि. राजवाडेंच्या खोडसाळपणाला कडक शब्दांत प्रत्युतर करून उच्च वर्णीयांचा मानखंड केला गेला म्हणून श्री. ठाकरेंचा ''ब्रह्मद्वेष्टे'' म्हणून पुकारा झाला. असो. श्री. ठाकरेंच्या वागणुकीत एक विशेष असे आणि तो हा कीं, सामाजिक अगर ज्ञातिकार्य असो ते त्याबाबतच्या कार्यकारित्वाच्या किंवा व्यवस्थेच्या बारिक सारिक भानगडींत ते कधींच पडत नाहींत. ते सर्व बाबी आपल्या मित्रांवरच सोंपवतात. त्यांची वृत्तीच झुंजार असल्यानें ते त्या कटकटींत शिरत नाहींत. ज्यांच्यावर त्यांनी विश्वास टाकला त्याला निष्ठेनें शेवटपर्यंत साह्य करणें हें ते आपलें कर्तव्यच मानतात. मात्र वादाला किंवा मतभेदाला कारण होऊं लागले मग ते सेनापतीचे अधिकार घेऊन दोन हात करण्याचे आव्हान स्वीकारितात. 

सारांश, कोणत्याहि चळवळींत अगर कार्यांत त्यांचा स्वभावतःच संयम पाळण्याचा निग्रह असे. या कालखंडांतील विशेष म्हणजे त्यांच्या जीवनांत बरीचशी स्थिरता आल्यानें त्यांना आपलें कार्यक्षेत्र थोडेसें विस्तृत करितां आले. त्यांनी जातीय संघटनेंत लक्ष घातल्यानें कांहीं क्रांतिकारक घटनाहि घडून आल्या. या तिधर्माच्या सोळा संस्कारांत जे भिक्षुकवर्गाकडून अत्याचार होत असत त्यांना आळा घातला. कै. गजानन भास्कर वैद्य यांच्या वैदिक विवाह पद्धतीचा जातींत प्रसार करून परिणामकारक बदल घडवून आणला. त्यामुळें मुख्य अडचणींच्या बाबींबरोबर लग्नसमारंभांत जो बराच अपव्यय होत होता तो थांबवून मानापानाच्या भानगडींचाहि परिहार केला. त्याचप्रमाणे हुंड्याच्या व्यापारी मनोवृत्तीपासून ज्ञातिसमूहाला परावर्तित केलां.

त्याचबरोबर दादरकर चां. का. प्रभूंत एक प्रकारची जातीय संघटनेंतील आपुलकीची भावना जागृत करवून राममारुति कार्यालय, दादर सभा वगैरे कार्ये यशस्वी करण्यांत पुढाकार घेणा-या मित्रांना साह्य करून त्यांना कार्यक्षम राखलें, परंतु या तिस-या कालखंडांत श्री. ठाकरेंच्या दहा बारा वर्षांच्या तिस-या कालखंडाची समाप्ती झाली आणि ते चवथ्या कालखंडात पदार्पण करण्यासा साता-यास निघून गेले. श्री. ठाकरे साता-यास गेले. त्यांना आपल्या बुद्धिविकासाच्या कार्यास फारच मोठें क्षेत्र मिळेल असें वाटलें. 

ब्राह्मणेतरांवर झालेला सामाजिक व धार्मिक अन्याय फार मोठा होता. तो दूर करण्यास चांगलीच संधी लाभली. या मनोराज्यांत ते होते. त्यांच्याच प्रमाणे कै. भाऊराव पाटीलहि त्या कै. कूपर महाशयांच्या जाळ्यांत अडकले होते. श्री. ठाकरेंकडे एक मोठा प्रेस चालवावयाचें व प्रकाशन प्रसिद्धिकरणाचें काम होतें. अगदीं अनियंत्रिंत सत्ता हातीं आल्याचा या दोघांस भास झालेला होता. प्रेसहि थाटला गेला. परंतु निवडणुका व व्यापार हा सरळ वृत्तीच्या माणसांना तितकासा धार्जिणा शेजारी नसतो याची जाणीव या द्वयींना जरा उशिरांच आली. तसेंच श्री. ठाकरेंच्या प्रभावी लेखणीची मदत तत्वापेक्षां स्वार्थाकडे लावण्याची तेथील सत्यशोधकांची व इतरांची कारवाई होती. तीहि त्यांच्या लढाऊ वृत्तीला विसंगत होती. तेव्हां दोघांहि मित्रांना नुकसानी करून घेण्यापुर्वीच जागृति आली आणि त्यांनीं आपली या जाळ्यांतून सुटका करून घेतली. श्री. ठाकरे पुण्यास आले. निराशा हेंच काय ते भांडवल त्यांच्याजवळ उरलें होतें. 

परंतु अवमानाला कर्तबगारीनें उत्तर देण्याच्या महत्वाकांक्षेची किंवा इर्षेची पत मात्र बाकी होती. त्या पतीवर श्री. ठाकरेंनी एक छोटासा छापखाना थाटला. मोडकें छपाईचें यंत्र व थोडा बहुत टाईप मिळविला. ''प्रबोधन'' मासिक सुरूं केलें. पांच वर्षे तें नियमित चालविलें. नांवहि कमाविलें. त्यावेळच्या जेधे जवळकर चळवळीचाहि थोडाबहुत अनुभव घेतला. परंतु ताबडतोब दूर सरले. श्री. ठाकरेंना तत्वनिष्ठेचें महत्व, तर नवीन नेतृत्वाची सारी ओढ स्वार्थापरार्थांत निष्पन्न झालेल्या व्यक्तिद्वेषाकडे. ही युति स्वभावत:च न टिकणारी होती. त्याचवेळीं तुकोजीराव होळकरांच्या विरुद्ध एक खळबळ उत्पन्न झाली. 

त्यांतील प्रचाराची सारा भर ब्राह्मण ब्राह्मणेत्तर हेव्यादाव्यावर होता. श्री. ठाकरेंनी स्वाभाविकच ब्राह्मणेतरांची बाजू घेतली. बरेच लेख लिहिले. ते प्रभावीहि ठरले. परंतु हा प्रभावच त्यांची पुण्यांतील प्रबोधनाची घडी विस्कटावयाला कारण झाला. श्री. ठाकरेंना इंदूरचे मंडळींनी आमिष दाखवून तिकडे नेलें. त्यावरून त्यांनी ''टेम्ट्रेस'' या नांवाचे एक इंग्रजी पुस्तकहि प्रसिद्ध केलें. परंतु त्यांच्या पुण्यांतील अनुपस्थितीनें प्रबोधनांत जो खंड पडला तो त्या प्रबोधनाचा शेवटच ठरला. शिवाय त्यांना इंदूरच्या धांवपळींत विशेष प्राप्ती झाली असेंहि नाहीं.

एकंदरीत ही नवी धांवपळ घातक ठरली. मासिक प्रबोधनांत जरी घट येत नव्हती तरी त्या काळी मासिकाच्या वर्गणीतून किंवा गेणग्यांतून त्यांचा घरखर्च चालेल अशी परिस्थिती निर्माण होणें कठीण होतें. त्यामुळें प्रबोधन जरी वेळेवर निघे तरी श्री. ठाकरेंना आपली दैनंदिनी भागविणें जडच जात होतें. पुन्हां नैराश्याच्या मनोर्मी उसळूं लागल्या. अर्थातच या मनोर्मींचा विशेष ताण त्यांच्या पत्नींनाच सहन करावा लागे. कारण संसारांत मोठा भाग त्यांच्याच हवाली झालेला होता, आणि संसारक्षेत्रांतील श्री. ठाकरेंची शीघ्रकोपी वृत्ति वैफल्यामुळें अनावर होत होती. परंतु त्यांचा शीघ्र कोप तितकाच क्षणिक राखण्याची दुर्घट कामगिरी, मनानें शांत व वृत्तीने जात्याच गरीब अशा, त्यांच्या पत्नींनी आपली निष्ठा, समजुतदारपणा व मौन धरून सर्व आपत्तीतून वाट काढण्याचा प्रयत्न केला. 

त्यांच्या पत्नींचे हे गुण मुलांत उतरल्यानेंच श्री. ठाकरेंना पुढील कालखंडात पुष्कळच मनःस्वास्थ लाभूं शकलें आहे. यांत त्यांच्या पत्नीचीच पुण्याई आहे. असो. श्री. ठाकरेंची परिस्थिती बरीच अस्थिर झाल्यानें त्यांना पुन्हां एकदां ''नाटकी जगां''त हालचाल करून कांही मार्ग काढण्याची शक्यता वाटली. परंतु वैफल्यच पदरीं पडल्यानें त्यांना पुढें कांही काळ कर्जत येथें अज्ञातवासांत घालवण्याची वेळ आली. या काळांत त्यांनी ''खरा ब्राह्मण'', ''विधि निषेध'' आणि ''टाकलेलें पोर'' ही नाटकें लिहिली व प्रसिद्धहि केलीं. श्री. ठाकरे या जन्मजात दरिद्र्याच्या पकडीचा परिहार करण्याकडे कधींहि विशेष लक्ष पुरवित नसत. 

त्यामुळे ही पकड त्यांना त्यांच्या कोणत्याहि कार्यांत यश येऊं देत नसे. त्यांची वृत्तीच संसारकार्यात लक्ष घालण्याकडे नसे. असो. या कालखंडांत श्री. ठाकरेंनी आपलें कार्यक्षेत्र बरेंच विस्तृत केलें होते. तशीच त्यांनी प्रबोधनाच्या सहवासांत आपली मनोवृत्तीहि उदात्त ठेविली होती. परंतु जीवनांतील स्थिरतेच्या अभावी त्यांच्या बुद्धीच्या व श्रमांच्या यशाला यावें तसें मूर्त स्वरूप आलें नाही. पांचव्या कालखंडांत ते पुन्हा मुंबईस गेले. 

जीवनस्वास्थाच्या नैसर्गिक कार्याकडे प्रथम लक्ष देण्याची आवश्यकता त्यांना पटली होती. वॉर्डन कंपनींत कांही वर्षे काढली. नंतर ते वाडिया पिक्चर्सला जाऊन मिळाले. तेथें कथा लेखन व मार्गदर्शन केलें. त्यामुळें त्यांना आपला बराच वेळ वाचन लेखनांस देतां आला. त्यांच्या ''पंडिता रमाबाई'' व ''आठवणी'' या पुस्तकांचा बराच गौरव झाला. पुष्कळ वर्षे रेंगाळत पडलेला ''रंगो बापूजी''हि बाहेर पडला व नंतर ''रायगडची सफर''हि लोकप्रिय झाली.

त्यांचे निरनिराळ्या मासिक-वृत्तपत्रांतून बरेच लेख प्रसिद्ध झाले. त्यांत त्यांनी ऐतिहासिर व सामाजिक चर्चा ब-याच उच्च पातळीवरून केल्यानें समाजांतील त्यांच्याबद्दलचे बरेच ग्रह दूर झाले. त्यांच्या लेखनशैलीचा पुण्यांत कै. न. चिं. केळकर यांनींहि गौरव केला होता. त्यांची जिवंत भाषासरणी ही सुरवातीपासूनच वाचकांना एक आकर्षण होते. नंतर त्यांना त्यांच्या मुलांचा आधार होतांच वयोमानाप्रमाणें त्यांना नोकरीच्या पाशांतून मुक्त होतां आलें. 

या कालखंडाच्या पूर्वार्धात जी त्यांच्या लोककार्याला मर्यादा राखावी लागत होती ती गेल्या दहा बारा वर्षांत पाळण्याचे कारण राहिलें नाही. ते शिवाजी पार्कवरील व दादरच्या इतर निरनिराळ्या सभासमितींत भाग घेऊं लागले. त्यांनी मोठ्या उत्साहानें शिवाजीपार्कवर उभारण्यांत यावयाच्या शिवाजी महाराज पुतळा समितीचें संचालन करण्याचें कार्य हाती घेतलें व त्या अनुसंधानानें ब-याच नव्या कार्यकर्त्यांच्या गटांत शिरले. 

श्री. ठाकरेंनी, त्यांच्या वयोमानाचा व त्यांच्या शारीरिक दुर्बळतेचा विचार केल्यास, आपल्या कार्यकर्तृत्वांत अभिमानास्पद चुणुक व निष्ठा दाखविली आहे. या कालखंडाच्या उत्तरार्धात तर संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न उभा राहिला आणि श्री. ठाकरेंनी, जरी पुर्वी राजकारणांत कांहींही भाग घेतला नव्हता तरी, महाराष्ट्राच्या संकटापत्तींतील जनताजनार्दनाची हांक ऐकतांच धैर्यानें, एकनिष्ठेनें आघाडीवर राहाण्याची तयारी केली आणि पुढाकार घेऊन ती यशस्वीपणें लढविली. परंतु हा लढा लढतांनाहि त्यांना राजकारणांतील लालुच शिवूं शकली नाही.

आपले अनेक सवंगड्यांच्या निवडणुका यशस्वीपणें लढविल्या, परंतु स्वतः त्यांनी या मानापानाची आस धरली नाही. इतकेंच नव्हे तर केलेल्या राष्ट्रसेवेबद्दल आपला गौरव करून घेण्याची अपेक्षा केली नाही. राजकारण हा त्यांचा आवडता विषय नव्हता. त्यांना फक्त महाराष्ट्राच्या लढ्यांतील प्रत्येक सुपुत्राचें पाईक म्हणून जें आद्य कर्तव्य तेंच तेवढें करावयाचें होते. त्यांच्या गेल्या दहा बारा वर्षांतील हालचाली वाचकांच्या परिचयाच्या आहेत. त्यांचा विस्तार करण्याची जरूर नाही.

श्री. ठाकरे येत्या १७ सप्टेंबरला आपली पंच्याहत्तर वर्षांची वाटचाल संपवून शहात्तराव्या वर्षांतील वाटचालीस सुरुवात करणार आहेत. त्यांनी आजपर्यंतची वाटचाल कोणत्या खडतर परिस्थितींत पार पाडली आहे व तसें करितांना त्यांना किती हालअपेष्ठांशी झगडावें लागलें आहे त्याची थोडी कल्पना यावी म्हणुन हा धांवता आराखडा दिला आहे. त्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते सामाजिक विषमतेच्या वादांत ती विषमता दूर करण्यासाठीं इतके त्नमयतेनें बढाई करितात की त्यांत ते आपला जीवनार्थहि विसरून जातात. बेदरकारपणें ते कोणत्याहि आघाडीवर ठाण मारून उभे राहतात. त्यांच्या असंख्य व ओजस्वी लेखांची किंवा त्यांच्या वैचित्र्यपूर्ण व रणझुंजार व्याख्यानांचा नामनिर्देश करण्यास कितीतरी विस्तार करावा लागेल. 

त्यांच्या आयुष्यातील अनेकविध आठवणी व गमती चार पांच कादंब-याच होतील. त्यांच्या लेखनशैलीची व व्याख्यानांतील गोलंदाजीची चुणुक निदान मुंबईकरांना व इतरहि मोठ्या शहरांना पाहावयास मिळालेली आहेच. तेव्हां त्यांच्या गुणावगुणाबद्दल विस्ताराची आवश्यकता नाहीं. मात्र पुष्कळांना खटकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे ज्या माणसाची लेखणी व वाणी एव्हढी तेजस्वी आणि कर्तृत्व व ध्येयनिष्ठा इतकी थोर त्यांच्या पुर्वायुष्यांतील कार्यसंभार असा सुप्त कां राहिला गेला. याचें कारण वरील माहितींत थोडेंबहुत मिळेल. श्री. ठाकरे यांच्या चिरंजीवांनी त्यांना दहा वर्षे जीवन विवंचनेंतून मुक्त ठेवल्यानें त्यांना फार मोठ्या देशकार्यात आदर्शनीय भाग घेऊन महाराष्ट्राच्या आघाडीवर राबतां आलें. 

कर्मधर्मसंयोगानें श्री. ठाकरेंना त्यांच्या शहात्तराव्या वर्षांत पदार्पण करितांना त्यांच्या चिरंजीवांनी ''मार्मिक'' साप्ताहिकाची उत्तम सोय करून दिल्यानें त्यांना आपल्या समाजकार्यात अधिक वैशिष्ठ्यानें मार्गदर्शन करण्याचा आनंद लाभत आहे. हा स्वानंद त्यांना चिरकाल उपभोगण्यासाठी आणि सामाजिक कार्यात उत्तरोत्तर अधिकाधिक मार्गदर्शन मिळण्य़ासाठी त्यांच्या अमृत वाढदिनीं त्यांना दीर्घायुष्य आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चिंतू या.