नाटककार प्रबोधनकार

 प्रभाकर पणशीकर

प्रबोधनकारांच्या नाटकांवर हा सविस्तर लेख लिहिलाय, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी. साहित्य संस्कृती मंडळाने प्रबोधनकारांच्या पाच नाटकांचा एकत्र खंड प्रकाशित केला तेव्हा याची प्रस्तावना म्हणून हा लेख लिहिण्यात आला होता.

विसाव्या शतकात महाराष्ट्रात जी काही वैशिष्ट पूर्ण व्यक्तीमत्वं निर्माण झाली त्यापैकी एक धगधगतं आणि सळसळतं व्यक्तिमत्व म्हणजे कै. केशवराव सिताराम ठाकरे. अर्वाचीन महाराष्ट्राच्या सामाजिक जाणिवा ज्यांनी समृद्ध केल्या, त्या जाणिवा ज्यांनी सातत्याने आणि प्रामाणिक प्रयत्न करून विस्तारल्या त्यापैकी एक अग्रणी म्हणजे कै. के. सी. ठाकरे. आपल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाच्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर, अंधश्रद्धेवर, भिक्षुकशाहीवर आणि अस्पृश्यांच्या जटिल प्रश्नांवर सातत्याने कठोर भाषेत टीका करून त्यांनी आपल्या या सुस्त समाजाला खडबडून जागं करण्याचा उपक्रम केला. ज्या काळात वृत्तपत्रांचे संपादकच मालक असत आणि आपलं नाव ते मोठ्या अभिमानानं पहिल्या पानावर ठळक अक्षरांत छापीत असत. आपल्या मतांचा निर्भिड ठसा त्या वृत्तपत्रावर उमटवीत असत त्या काळातलं ‘प्रबोधन’ हे एक दखलपात्र वृत्तपत्र आणि कै. ‘के. सी.’ ही आद्याक्षरं गळून पडली आणि प्रबोधनकार ठाकरे या नावानेच ते अजरामर झाले!

वयात आल्यापासूनच प्रबोधनकारांनी लेखणी हातात धरली आणि अखेरपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर लिहितच राहिली. लोकहितवादी आणि आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा त्यांनी पाठपुरावा केला. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या समतावादी आणि आक्रमक विचारांचा यथाशक्ती प्रचार केला. महर्षि शाहू महाराजांच्या बहुजनसमाजाच्या क्रांतीत सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धाराच्या उठावात सक्रीय भाग घेतला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बीजरूपी कल्पनेला आपुलकीचं खतपाणी घातलं. 

आपल्या माफक उत्पन्नात कुटुंबाच्या किमान गरजा भागवायला न विसरता, प्रबोधनकार आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या सहाय्यानं वेगवेगळ्या सामाजिक आघाड्यांवर कायम धडधडत राहिले. वाचन, मनन, चिंतन आणि लेखनात आकंठ बुडालेल्या प्रबोधनकारांची विविध विषयांवरची ग्रंथसंपदा आणि त्यासाठी त्यांनी व्यसनी माणसाच्या आसक्तीने केलेली ग्रंथ खरेदी आणि वाचन तर थक्क होण्यासारखं आहे. त्यांची ‘जीवनगाथा’ म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टींच्या माध्यमातून उलगडत जाणारा अर्वाचीन महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आहे. तर त्यांचं ‘रंगो बापूजी’ म्हणजे, भल्या भल्या इतिहासकारांनीसुद्धा अचंबित व्हावं असा मराठ्यांच्या इतिहासाच्या अखेरच्या पर्वाचा अस्सल ऐतिहासिक दस्तऐवज आहे. 

धर्मशास्त्रापासून समाजशास्त्रापर्यंत अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण आणि विवेचक ग्रंथ लिहिणा-या प्रबोधनकारांना मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान लाभू नये ही मोठी खेदाची बाब आहे! परंतु असले सन्मान मिळविण्यासाठी आपल्या तत्त्वांना शाब्दिक मुरडही घालण्याइतके प्रबोधनकार बोटचेपे नव्हते आणि म्हणूनच ते संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत हाच त्यांचा बहुमान आहे! अशा या चाकोरीबाह्य साहित्यकाचं समग्र साहित्य प्रकाशित करण्याच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या निर्णयाचं मनापासून अभिनंदन. एखाद्या चौकात त्यांचा पुतळा उभारण्यापेक्षाही आणि एखाद्या रस्त्याला त्यांचं नावं देण्यापेक्षाही हे प्रबोधनकारांचं उचित स्मारक ठरणार आहे. शब्दकळेचा स्वामी, पुढील पिढ्यांसाठी शब्दकळेतच उपलब्ध करणं हेच त्या शब्दकळाकाराचं भाग्य!!

प्रबोधनकारांच्या ग्रंथांचे २ खंड एव्हाना प्रकाशित झाले आहेत. प्रस्तुतचा हा तिसरा खंड त्यांच्या नाटकांचा. ह्या नाट्यखंडाची प्रस्तावना मी लिहावी, असा प्रस्ताव प्रबोधनकारांचे एक भाविक कल्याणशिष्य आणि या संपादक समितीचे निमंत्रक ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक श्री. पंढरीनाथ सावंत यांनी माझ्यासमोर ठेवला आणि मी ताडमाड उडालोच. ‘इये मराठीचिये नगरी’ प्रस्तावनेला खूप महत्त्व आहे. अनेक ग्रंथांच्या प्रस्तावना मूळ ग्रंथापेक्षाही सरस उतरल्या आहेत आणि अनेक साहित्यिक त्यांच्या मौलिक ग्रंथापेक्षाही त्यांनी इतरांच्या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावनांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. 

या मालिकेत प्रकाशीत झालेल्या प्रबोधनकारांच्या चरित्रग्रंथाला कै. धनंजय कीर या ख्यातकीर्त चरित्रलेखकाची तर रंगो बापूजी या इतिहास ग्रंथाला डॉ अ. रा. कुलकर्णी या जानेमाने इतिहासतज्ञाची प्रस्तावना लाभली आहे. याच न्यायाने नाटकांच्या खंडाला नाटक्याची प्रस्तावना म्हणून माझी निवड करण्यात आली असली तरी मी शब्दगंगेच्या पलीकडच्या तीरावरचा प्रवासी आहे हे ध्यानात घेणं आवश्यक आहे. निमिर्तीच्या आणि भूमिकेच्या दृष्टीने एखाद्या नाटकाचा अभ्यास करणं वेगळं आणि प्रस्तावना लिहिण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वाङमयीन शास्त्रीय दृष्टी असणं वेगळं. नाटक ही एकमेव जीवननिष्ठा यापलिकडे माझ्याकडे कोणतंही अधिष्ठान नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे. 

परंतु मी नकारासाठी तोंड उघडण्यापूर्वी माझ्या हातात प्रबोधनकारांची ५ नाटकं कोंबून ‘पृष्ठांची मर्यादा नाही, वेळेचं बंधन नाही’ अस मला सुनावून पंढरीनाथ सावंत अंतर्धान पावले! तरी त्यांनी माझ्या हातात ठेवलेली नाटकं मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत होती. यथाकाल मी ती वाचली आणि माझ्या प्रतिक्रिया मी शब्दबद्ध करीत आहे. नाट्याचा उत्कर्ष-उपकर्ष, प्रवेशांची आणि अंकांची नाट्यपरिणामांच्या दृष्टीनं होणारी मांडणी, स्वभावरेखाटन वगैरे वगैरे शास्त्रीय जंजाळात न गुरफटता मी फक्त नाट्यावलोकन करणार आहे. हे नाट्यावलोकन करीत असताना प्रबोधनकारांचं अन्य साहित्यही मी वाचलं, मला अज्ञात असलेल्या त्यांच्या अनेक पैलूंचं विश्वरूपदर्शन मला घडलं. मी अभावितपणे त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि म्हणूनच माझ्या या किंचित भावुक अंगानं घडणाया नाट्यावलोकनाला मी "केशवाय नमः।" म्हणून सुरुवात करीत आहे.

प्रबोधनकार ऐन विशीत असतानाच सांगलीकर स्त्री नाटक मंडळी आपले खेळ करण्यासाठी त्यांच्या जन्मग्रामी पनवेलीस आली होती. आयुष्यात पुढे काय करायचं हे नक्की ठरलं नसलं तरी आपल्या लेखणीची ताकद तरुण केशवरावांना समजली होती. त्या उत्साहाच्या भरात त्यांनी एक नाटक लिहिलं आणि त्या नाटकाचं वाचन त्या नाटक मंडळीत झालं. पहिल्याच बैठकीत नाटक पसंत पडलं म्हणजे ते नाटक नाकीडोळी नीटस असलं पाहिजे. 

या नाटकाच्या व्यवहारापोटी बयाणा रक्कम म्हणून पन्नास रुपये खिशात खुळखुळवतच केशवराव घरी परतले. याच नाटकमंडळींबरोबर मास्तर म्हणून जाण्याची संधी त्यांना मिळाली. घरातल्या थोरामोठ्यांच्या आशिर्वादानं आणि गावातल्या कुटाळांच्या "रांडांच्या कंपनीत गेला" अशा शेलक्या आहेराच्या बळावर केशवरावांनी नाटक मंडळीत पाऊल ठेवलं. त्या नाटक मंडळीत त्यांचं पाऊल स्थिरावलं नाही पण अनेक नाटकमंडळ्यांची बि-हाडं बदलत अखेर ते "स्वदेशहितचिंतक" या नामांकित मंडळींत स्थिरावलं. याच मंडळीत त्यांचा जनुभाऊ निंबकरांसारख्या निष्णात नाट्याभिनयशिक्षकाचा अकृत्रिम स्नेह लाभला.

कृष्णराव गोरेंसारख्या अभिजात गायक नटाचा सुरेल सहवास मिळाला आणि "गुरुणाम् गुरू" असलेल्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची रसिली साहित्यिक मैत्रीही लाभली. ‘स्वदेशहितचिंतक’ मंडळींच्या अमरावती येथील छावणीत मुक्कामाला असताना केशवरावांचं पहिलं ‘सीताशुद्धी’ हे नाटक प्रकाशित झालं. कोणत्याही नाटकाचा रंगभूमीवर प्रयोग होण्यापूर्वी त्या नाटकाचं पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यावेळी प्रघात नव्हता त्याअर्थी या नाटकाचे खेळ सुरू झाले असले पाहिजेत, असा तर्क करायला साधार वाव आहे. परंतु ते कोणत्या नाटक मंडळीने केलं, कोणी भूमिका केल्या, किती प्रयोग झाले, प्रयोग कसे झाले याचा तपशील मात्र कुठंच मिळत नाही. 

नाटकाच्या प्रस्तावनेत ‘एकदोन नाटक मंडळ्यांच्या तालमीत तावूनसुलाखून निघालेली रंगावृत्ती’ असा उल्लेख आहे. म्हणजे हे नाटक तालमीत घेतल गेलं होतं. त्यातील प्रत्येक पदाच्या डोक्यावर ते पद कोणत्या गाण्याच्या चालीवर म्हणायचं याचा रागांसकट आणि वृत्तासकट उल्लेख आहे, म्हणजे त्या अवस्थेपर्यंत तालीम गेली होती. प्रत्येक प्रवेशाच्या सुरुवातीला स्थळनिर्देश आहे. नांदी-मंगलाचरणापासून तो थेट भरतवाक्यांपर्यंत घेऊन जाणा-या या परिपूर्ण नाटकाचा प्रयोग मात्र झाला की नाही, हा एक संशोधनाचा मुद्दा आहे.

‘सीताशुद्धी’ हे नाटक रामायणाच्या रामायण युद्धावर, सीतामुक्तीवर आणि नंतर सीताशुद्धीच्या कथाभागावर बेतलेलं आहे, त्या काळाच्या गरजेप्रमाणे नाटक मोठं आणि ५ अंकात विभागलेलं बहुप्रवेशी आणि अर्थातच बहुपात्री आहे. मूळ कथानकात कल्पनाविलासाच्या जागा सोडल्यास नाटककारानं कोणतंही स्वातंत्र्य घेतलेलं नाही. त्यानंतर याच कथाभागावर आधारलेल्या आधुनिक नाटकात प्रभु रामचंद्राला सीता जाब विचारते. 

उर्मिला लक्ष्मणाला वाक्ताडन करते, अनायर् जम्बूक आगंतुकपणे कथानकात घुसून रामाची हजेरी घेतो. पण केशवराव तसं काही करीत नाहीत. अतिशय सरळ सोप्या आणि प्रासादिक भाषेत ते आपला कथाभाग मांडतात, हे प्रायः युद्धनाट्य असल्याकारणाने उभयपक्षांचे योद्धे, सेनानी आणि अन्य गोतावळा, राजस्त्रिया आणि दासींच्या घोळक्यासह इथं वावरतो, मारुती आणि वानरसेना, रावण आणि राक्षससेना कोणत्या रंगभूषेत आणि वेशभूषेत वावरत

असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर लंकेत उतू जात असलेला उन्माद आणि सत्पक्षाच्या सत्वशीलपणामुळे रामाकडील बाजूचा वाढत जाणारा आत्मविश्वास आणि अंतिम विजय नाटककारानं अचूक पकडला आहे. तत्कालीन रंगभूमीच्या मर्यादा लक्षात घेता २०-२५ फुटांच्या मर्यादेत वरखाली होणा-या पडद्यांच्या सहाय्याने गॅसबत्तीच्या उजेडात या नाटकातील समरांगणापासून समुद्रापर्यंतची दृष्य कशी दाखवली असतील? परंतु त्यावेळेचे कलाकार आणि तंत्रज्ञ खूपच वाकबगार होते आणि प्रेक्षक खूपच समजूतदार होता हेच खरं!

या नाटकात रामाकडील पक्षात वनचर नावाचं एक गंजड पात्र आहे. हे विनोदी पात्र बहुशः ह-हा-च्या बाराखडी बोलून धमाल उडवत असलं पाहिजे. अर्वाचीन काळातल्या प्रा. मधुकर तोरडमलांच्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ मधील हा-हा-कारी आणि किंचित चावट असलेल्या प्रा. बारटक्क्यांचा चावट असलेला आजोबा शोभावा असं हे पात्र आहे.

सीताशुद्धी नाटकातील लक्ष वेधून घेणारी जमेची बाब म्हणजे त्यातील पदं. संगीत नाटकातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाण्याच्या जागा आणि त्या जागी उत्तम पदाची योजना. या दोन्ही बाबतीत नाटककार शंभर टक्के यशस्वी झाला आहे. नाटकातल्या पदांची रचना, योग्य आशय कमी शब्दांत व्यक्त करणारी असावी. पदाचं तोंड आणि अंताची अखेर शक्यतो आकारांत असावी. गायक नटाला आलापीसाठी आणि तान घेण्यासाठी या जागांचा उपयोग व्हावा. नाट्याचार्य देवलांनी आपल्या आणि इतरांच्या नाटकांतही आदर्श आणि गेय भावानुकूल ग्रंथ रचनेचा आदर्श निर्माण केला. परंतु नंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर-गडक-यांपासून तो थेट आचार्य अत्र्यांपर्यंत अनेक नाटककारांना ते स्वतः कवी असून उत्तम नाट्यगीत रचता आली नाहीत. ही एक वेगळीच इल्लम आहे. 

कोल्हटकर-खाडीलकरांच्या नाटकातली बरीचशी ‘पदं’ क्लिष्ट आहेत. गडक-यांच्या नाटकातील अनेक पदं वि. सि. गुर्जरांनी बांधली आहेत. स. अ. शुक्ल उत्तम पदं रचित. अर्वाचीन काळात मो. ग. रांगणेकरांची पदं उत्तम असत. नाट्यपद रचणा-यावर शब्द प्रसन्न हवेतच परंतु त्याला गायनाचं अंग असणंही तितकच महत्त्वाचं असतं. सुदैवाने केशवराव या दोन्ही अंगांनी समृद्ध होते. या नाटकांत झटपट गाण्यासाठी केशवरावांनी कीर्तनाच्या अंगानी गायिली जाणारी आर्या, साकी, दिंडी, झंपा इत्यादी वृत्तं सफाईनं वापरलीत. मारुतीच्या तोंडी असलेला "धडड झंझावात सुटला, कडकड तरुहि उमलती" हा झंपा तर समर्थ रामदासांच्या शब्दकळेची याद करून देणारा आहे. गायकीच्या रागदारी ढंगातली पदंही या नाटकात आहेत. 

अनेक पदं लोकप्रिय नाट्यगीतांवर बांधली आहेत. ही गाणी रचण्यासाठी आवश्यक असलेली जाण केशवरावांना कृष्णराव गोरेंसारख्या गायक नटाच्या मैत्रीतून लाभली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांकडून त्यांना नव्या ढंगाच्या उडत्या चाली मिळाल्या. स्वतः केशवराव शास्त्रोक्त गाण्यातले दर्दी होतेच आणि उत्तम सतारही वाजवीत. परिणामस्वरूप केशवरावांनी या नाटकात अनेक उत्तम पदं रचिली आहेत. आजही श्री. स्नेहल भाटकरांसारख्या बुजुर्ग संगीतदिग्दशर्काकडून यातील काही निवडक पदं पुन्हा बांधून घेऊन ती श्री. प्रभाकर कारेकर, फैयाज वगैरे गुणी मंडळींकडून गाऊन घेतली तर ती नाट्यगीतांच्या मैफिलीत मानाचं स्थान पटकावतील यात शंका नाही. परंतु एकूणच ‘सीताशुद्धी’ हे नाटक सरळमार्गी आहे. कथानक माहीत असल्याकारणाने अपेक्षित तेच घडतं आणि अपेक्षित तेवढचं घडतं!

इसवी सन १९०९च्या सुमारास ‘सीताशुद्धी’ प्रसिद्ध झालं आणि लगेच केशवरावांनी आपला नाटकमंडळीतला गाशा गुंडाळला. परंतु या ५-७ वर्षांच्या नाटक मंडळीतल्या वास्तव्यात त्यांचा अनेक गुणिजनांशी, साहित्यिकांशी, पुढा-यांशी परिचय झाला. ही स्नेहाची शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरली. याच काळात त्यांच्या मुळातल्या सामाजिक जाणिवा प्रखर बनल्या. जीवनाचं इतिकर्तव्य समजलं. केशवराव ठाक-यांचे प्रबोधनकार ठाकरे बनले. 

त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी म्हणजे १९३० साली त्यांनी आपली लेखणी पुन्हा नाटक लिहिण्यासाठी उचलली कारण तत्कालीनच घडलं. प्रबोधनकारांचा कर्जत येथे मुक्काम असताना तिथ एक नाटकमंडळी आली. काळ कर्ते शि. म. परांजप्यांचं कर्णाच्या जीवनावरील ‘पहिला पांडव’ नाटक पाहायला ते गेले आणि संतापानं घरी परतले. ‘मला पहिला पांडव म्हणा हो’ म्हणून केविलवाणेपणाने याचना करणारा कर्ण त्यांना बिलकूल पटला नाही. त्याच तिरीमिरीत त्यांनी कर्णाच्याच चरित्रावर नाटक लिहिलं. 

‘टाकलेलं पोर’ नाटकाच्या नावातच त्याच्या वेगळेपणाची झलक दिसते. प्रबोधनकारांचा महाभारताचा व्यासंग होताच कर्णचरित्र्याच्या माध्यमातून त्यांनी महाभारतातील अनेक व्यक्तिरेखांच्या यथास्थित परामर्श घेतला आहेच पण त्या ग्रंथातील अनेक अनीतिमान कथांचा मोठ्या आविशाने पर्दाफाश केला आहे. तोपर्यंत प्रबोधनकरांच्या सामाजिक धारणा पक्क्या झाल्या होत्या. भ्रूणत्याग आणि भ्रूणहत्या या दोन अमानुष कलंकांवर त्यांना या नाटकाच्या माध्यमातून टीका करता आली. जन्मतःच त्याग करणा-या जन्मदत्त क्षत्रियकुला-पेक्षा दैवदत्त शूद्र सूतकुळाचा सार्थ अभिमान बाळगणारा कर्ण धीरोदत्त वाटतो. या नाटकातील कर्ण-कृष्ण प्रवेश आणि कर्ण-कुंती प्रवेश तर विचाराच्या दृष्टीने स्फोटक आहेत. कर्णचरित्राचा वेध घेण्याचा प्रयत्न या शतकांत अनेक साहित्यिकांनी केला पण आपल्या जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा असलेला कर्ण फक्त प्रबोधनकारांनीच रंगवला. शेवटच्या दृष्यातील कर्ण-कृष्ण जुगलबंदी तर अप्रतिम आहे.

या नाटकात विनोदासाठी वापरलेला ‘हिरडा बेहडा आवळकटी’ ही त्रयी तर धमालच आहेत. हिरडा गवई आहे. ‘नादिर्दिदिरतुम्’ च्या सांगितिक परिभाषेत बोलतो. बेहडा पखवाजी आहे. ‘धिरकिट थोम’ च्या मृदंगी बोलात बोलतो. आवळकटी या अविवाहित दासीची प्रियाराधना करताना हे दोघेही संभावित विवाहित पुरुष तत्कालीन नीतिकल्पनांची आणि त्याचबरोबर महाभारतातील अगम्य जन्मकथांची जी इरसाल खिल्ली उडवतात ती नुसती वाचनीयच नव्हे तर एकूणच नीतिकल्पनांचा पुन्हा एकदा नव्याने विचार करायला लावणारी आहेत. 

चमत्काराच्या बुरख्याआड महाभारतासारख्या शिष्टसंमत ग्रंथात उजळ माथ्याने वावरणा-या अनेक अनैतिक कथांचा प्रबोधनकारांनी अतिशय परखड भाषेत समाचार घेतला आहे. प्रबोधनकारांच्या उपहासगर्भ विनोदाला आणि सांगीतिक ज्ञानाला या भूमिकांमधून खूप वाव लाभला आहे.

महाभारताची उत्तम जाण असलेल्या प्रबोधनकारांचं ‘टाकलेलं पोर’ हे एक स्फोटक नाटक आहे. त्यांच्या खास ‘ठाकरी’ भाषेचा आसूड या नाटकात वाक्यावाक्यातून ओढलेला दिसतो. महाभारताचं एक वेगळं चिंतन या नाटकात आहे. कुमारी मातेचा प्रश्न यात आहेच पण आगतिक तरुण विधवा मातांबद्दलही प्रबोधनकार तळमळून लिहितात. निसर्गनियमांपेक्षा मानवनिर्मित नीतिनियम मोठे असू शकत नाहीत. हा एक विस्फोटक विचार त्यांनी या नाटकांत दिलाच आणि कुमारी मातांनी आणि विधवा मातांनीही, समाजाचा रोष आणि अवहेलना पत्करूनही आपल्या पोटच्या मुलांना जन्म द्यावा आणि त्यांना वाढवावं असा संदेशही त्या काळात दिला आहे.

स्त्री-पुरुष एकत्र आल्याशिवाय अपत्यसंभव संभवत नाही, असा निसर्गनियम असताना महाभारतातल्या अनेक मान्यवरांच्या जन्माला अदभुतरम्य बहाल करून त्यांना लब्धप्रतिष्ठित बनवण्याच्या महाभारतकारांच्या खटाटोपाचा प्रबोधनकारांनी या नाटकात खरपूस समाचार घेतला आहे. या नाटकात महाभारतावर एक अश्रुत टीकाटिप्पणी आहे आणि ती आनंद साधल्यांच्या ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ या ग्रंथापूर्वी अनेक वर्षे प्रबोधनकारांनी केली आहे.

१९३० साली लिहिलेल्या या नाटकाच्या पहिल्या दोन अंकांचा एक प्रयोग प्रबोधनकारांनी आपल्या डेक्कन स्पार्क्स या संस्थेमार्फत १९३४/३५ मध्ये खान्देशात फैझपूर येथे केला. त्यातल्या कुमारी मातेच्या चित्रीकरणाचा प्रेक्षकांवर इतका परिणाम झाला की, दुस-याच दिवशी जवळच्याच यावल गावातल्या एका वाळीत टाकलेल्या कुमारी गर्भार मुलीचा विवाह तिच्याशी लग्न करू इच्छिणा-या आणि त्या स्थितीला जबाबदार असणा-या तिच्याच समाजातल्या तरुणाशी लावून देण्यात आला. हे झालं नसतं तर तिच्यावर आणि तिच्या अपत्यावर हक्का सांगायला गावातला एक मुसलमान तरुण पुढे आलाच होता. 

तो तिला घेऊन गेला असता आणि तिच्या पोटची मुलं कालांतरानं आपल्याच हिंदु समाजाच्या छाताडावर थै-थै नाचली असती! असो, परंतु इतक्या परिणामकारक नाटकाचा व्यवसायिक प्रयोग करायला कोणीच पुढ कसं आलं नाही? जुन्या नाटकमंडळ्या त्या काळात धडाधड बंद पडत गेल्या हे खर परंतु अनेक नव्या नव्या नाट्यसंस्था जन्माला येतच होत्या. आधुनिकतेच्या नावाखाली विलायतादी नाटकांची रोपटी मराठी मातीत रुजवण्याची त्या काळी फॅशन होती. प्रबोधनकारांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांच्याकडे ‘बर्नार्ड शॉचा मंत्र आणि इब्सनी तंत्र’ नव्हतं तरीही ‘टाकलेलं पोर’ नाटकामध्ये भरपूर सामाजिक आशय होता याची दखल का घेतली गेली नाही? नाटक लिहून पूर्ण झाल्यानंतर ९ वर्षांनी १९३९ साली मुंबईतल्या पाठारे प्रभू समाजातल्या हौशी पण गुणी नटांच्या चित्तरंजन नाट्य समाजाने या नाटकाचे बरेच प्रयोग केले. 

या नाटकानंतर कर्णासारख्या व्यक्तीरेखेच्या उदास आत्ममग्न आणि हॅम्लेटी स्वरूपाच्या नाट्यआवृत्या खूप निघाल्या. त्या रंगभूमीवर आल्या गेल्या देखील. पण धीरोदत्त स्पष्टवक्ता जन्मदात्या आईला तिच्या कर्तव्यच्युतीची जाणीव करून देणारा आणि दैवद्त्त शूर्द्र सूतकुळाशी इमान राखणारा प्रबोधनकारांचा कर्ण त्या व्यक्तीरेखेइतकाच अजूनही उपेक्षित राहिला आहे. कारण फक्त ‘ठाकरे’, दुसरं काय? मराठी नाट्यकलेच्या पुनरुत्थानासाठी १९४४ पासून मुंबई मराठी साहित्य संघाने अनेक नाट्यमहोत्सव घडवून त्या महोत्सवात अनेक नव्या जुन्या नाटकांचे क्वचित चांगल्या नसलेल्या नाटकांचेही प्रयोग केले पण प्रबोधनकारांच्या एकाही नाटकाचा प्रयोग त्या महोत्सवात झाला नाही. 

याबाबतीतील प्रबोधनकारांचं भाष्य खूपच बोलकं आणि बोचरं आहे. ते म्हणतात ‘मराठी रंगभूमीतील मर्त्य पृथ्वीवरून स्वर्गीय ऐश्वर्याचे आनंदसाम्राज्य देण्यासाठी’ आपल्या कलावंत जीवनाचे पापड भाजणा-या पांढरपेशा शहरी शहाण्यांनी काय म्हणून माझ्या नाटकांची दखल घ्यावी? असो, निदान त्यांच्या या नाटकांच्या खंडांच्या प्रकाशनाच्या सोहळ्यात तरी त्यांच्या सगळ्याच नाही तरी एखाद्या नाटकाचा प्रयोग घडवून आणावा अशी अपेक्षा आहे!

‘टाकलेलं पोर’ नाटक लिहिण्याच्या काळातच कर्जत येथे मुक्काम असताना प्रबोधनकारांनी ‘ध्रुवाचं अढळपद’ नावाचं एक पौराणिक नाटक लिहिलं. एक नव्यानंच जन्माला येऊ घातलेल्या नाटक मंडळीनं ते तालमीत घेतलं. पडदे रंगवून घेण्यापर्यंत तयारी झाली. पण कुठंतरी अडचण शिंकली ती उभी राहणारी मंडळी कोसळली. त्या वाताहतीमध्ये प्रबोधनकारांच्या नाटकाचं बाड कुठं भरकटत गेलं कळलंच नाही. ‘ध्रुवाचं अढळपद’ कुठं आढळत नाही. त्याबद्दल काही लिहिता येत नाही! ह्याच सुमारास प्रबोधनकारांनी एक ‘काळाचा काळ’ नावाचं ऐतिहासिक नाटक लिहिलं. तो जमाना संगीत नाटकाप्रमाणे ऐतिहासिक नाटकांचाही होता. 

प्रबोधनकारांनी या नाटकासाठी चितोडची पार्श्वभूमी निवडली आहे. सिंहासनावर बसलेल्या आपल्या सावत्र भावाला दगाबाजीनं ठार मारून त्याची गादी बळकावणा-या बनबीराची आणि त्याचा सूड उगवून पुन्हा आपलं राज्य मिळविण्यासाठी धडपडणा-या अजयसिंहाची ही कथा आहे. या सूडकथेत अर्थातच भुयार, चोरवाटा, वेषांतर, रहस्य, प्रेमकथा आणि तलवारीचा खणखणाट आहे आणि प्रत्येक रजपूत कथेत एखादी कमलकुमारी असते तशीच एक कमलकुमारीही आहे. हाडवै-याच्याच मुलीच्या प्रेमात पडण्याचा ‘रोमियो ज्युलिएटी’ थाट इथं आहे.

अद्भूतरम्य ऐतिहासिक नाटकाच्या सर्व गरजा या नाटकात भागवल्या आहेत परंतु तरीही प्रबोधनकार झाल्यानंतरच्या ठाक-यांचं हे नाटक वाटत नाही ते ‘सीताशुद्धी’ कार ठाक-यांच्या वळणाचं नाटक आहे. हे नाटक प्रत्यक्ष लिहिण्याचं कार्य जरी १९३० साली झालं असलं तरी त्याचा मानसजन्म खूप आधीचा असावा. हे नाटक रंगभूमीवर आलंच नाही. त्याची एक टाईप केलेली प्रत १९५३-५४ मधील प्रबोधनकारांच्या जुन्या ट्रंकेत सापडली. तीच आता १९९९ मध्ये प्रसिद्ध होत आहे.

या नाटकातील प्रबोधनकारांची भाषा मात्र लक्ष वेधून घेणारी आहे. ‘सीताशुद्धी’ नाटकात राजा रविवर्म्याच्या चित्रातल्या नायिकांच्या भारदस्त आणि गरती चालीनं चालणारी प्रबोधनकारांची भाषा या नाटकात नजाकतीनं थिरकताना आढळते. सुंदर कल्पनांचा शाब्दिक सडा नाटकभर पडलेला आढळतो. अनुप्रासादि अनेक अलंकारांनी नटलेली वाक्यच्या वाक्य या नाटकात संवादरूपानं प्रकटतात. कोल्हटकर-गडक-यांप्रमाणेच प्रबोधनकारही शैलीदार भाषाप्रभु होते हेच खरं!

प्रबोधनकारांचा हा कर्जतचा मुक्काम म्हणजे त्यांचा नाटक लिहिण्याचा मोसम होता. याच मुक्कामात त्यांना नटश्रेष्ठ केशवराव दाते भेटले. त्या भेटीत प्रबोधनकारांनी अस्पृश्योद्धारावर एक नाटक लिहिण्याचा प्रस्ताव पुढे आला. संत एकनाथांच्या जीवनाची पार्श्वभूमी घेऊन नाटक रचायचं ठरलं. ते केशवराव निघून गेले. हे केशवराव कामाला लागले. मुळातच प्रबोधनकांना अस्पृश्यांच्या लढ्याबद्दल जिव्हाळा. लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यांना बरोबरीनं वागवण्याचं बाळकडू त्यांच्या आजीपासून मिळालं होतं. 

तेव्हापासूनच वर्णश्रमव्यवस्थेबद्दल आणि त्या व्यवस्थेचा फायदा घेऊन अंत्यजांना जनावरांपेक्षाही हीन वागणूक देणा-या उच्च वर्णीयांबद्दल एक प्रचंड तिडीक त्यांच्या मनात निर्माण झाली होती. जाणतेपणाबरोबर प्रबोधनकारांची ही तिडीक प्रक्षुब्ध होत गेली. या शतकाच्या सुरूवातीच्या काळात महाराष्ट्रात अस्पृश्योद्धाराच्या जेवढ्या चळवळी आणि उठाव झाले त्यात त्यांनी सक्रीय भाग घेतलाच पण आपल्या शस्त्रापेक्षाही धारदार असलेल्या लेखणीनं आणि वाणीनं भटाळलेल्या सनातन हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्याविषयक कालबाह्य आणि अमानुष ढोंगीपणावर कडाडून टीका केली होती. अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशापासून समान पाणवठ्यापर्यंतच्या प्रत्येक लढ्यांत त्यांनी हिरिरीनं भाग घेतला होता. 

दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात श्रीगणेशाची पूजा अस्पृश्यांच्या हातून करवण्याचा पराक्रमही त्यांनी केला होता. अस्पृश्योद्धाराबद्दल निश्चित कल्पना असणा-या प्रबोधनकारांनी ‘खरा ब्राम्हण’ हे नाटक त्याच धगीतून फुलवलं आहे. दक्षिणकाशी समजल्या जाणा-या आणि भिक्षुकशाहीचं प्रचंड दडपण असलेल्या पैठणच्या पार्श्वभूमीवर संत एकनाथांच्या चरित्राच्या माध्यमातून त्यांनी ‘खरा ब्राम्हण’ उभा केला आहे. संत ज्ञानेश्वरांची आणि त्यांच्या अश्राप भावंडांची ज्या पैठणमध्ये अहंमन्य भटभिक्षुकांनी दारूण अवहेलना केली होती त्याच पैठणमध्ये हे नाटक आकार घेतं. ज्ञानोबांनी समतावादी भागवत धर्माची माळकरी संप्रदायाची क्रांतिकारी मुहूर्तमेढ जिथं रोवली त्याच पैठणमधील अरेराव भिक्षुक आणि बडवे त्याच अभिनव मुहूर्तमेढीचा पाया ठिसूळ करण्यात आणि श्रद्धाळू समाजाला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात दंग होते. रामनवमीच्या दिवशी राममंदिराच्या पाय-यांजवळ उभा राहून आपला हार कोणीतरी सवर्णानं प्रभु रामचंद्राच्या पायावर वाहावा अशी केविलवाणी याचना करणारा विठू वेसकर महार आपल्याला दिसतो. देव देश धर्मासाठी त्याचा एकुलता एक मुलगा रामजी लढाईत कामी आला आहे. 

त्याच्या सीता नावाच्या सुंदर विधवा बायकोनं हा फुलांचा हार तयार केला आहे. पैठणची देवळं मुसलमानी आक्रमणापासून वाचवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, त्याच्या बापाची आणि बायकोची त्या उध्वस्त न झालेल्या देवळातील पुजारी आणि बडवे कशी संभावना करतात याचं हृदयस्पर्शी चित्रण प्रबोधनकारांनी केलं आहे. मुसलमान आक्रमकांनी आपल्या पूज्य देवदेवता छिन्नविच्छन्न करून आमच्या मंदिरांच्या मशिदी बनवल्या तरी त्यांचा सूड घेण्यासाठी न शिवशिवणारे आमचे षंढ हात त्याच मंदिरांचं रक्षण करण्यासाठी रक्त सांडणा-या अस्पृश्यांना, त्याच मंदिरात प्रवेश करताना कसे ताठरपणान अडवतात हे बघण्यासारखं आहे. महाराची सावलीसुद्धा अस्पर्श मानणारे आमचे धर्ममार्तंड, सुंदर महारणीकडून स्पर्शसुखाची जिभल्या चाटीत अपेक्षा करतात हा विरोधाभास फक्त आपल्याच ढोंगी सनातन धर्मात दिसतो. अस्पृश्यांना जवळ घेणा-या कनवाळू एकनाथांना वाळीत टाकलं जात ते वस्तीला महारवाड्यात जातात. महारवाड्याचं विठ्ठलवाड्यात रूपांतर करतात. 

सवर्णांनी आणि भटभिक्षुकांनी आणलेल्या अनेक संकटांवर आणि बालटांवर अखेर एकनाथांच्या सोशिकपणानं आणि श्रद्धेनं मात होते. एकनाथांच्या बंदोबस्त करण्यासाठी मुद्दाम काशीहून आयात केलेले महापंडीत एकनाथांच्या शुद्धतेची ग्वाही देतातच पण देव-देश धर्मासाठी सर्वस्वाची आहुती देणा-या विठू महारालाच खरा ब्राम्हण मानून त्याला प्रेमादरानं आलिंगन देतात इथं नाटक संपतं.... ब्राम्हणाची व्याख्याच या नाटकात प्रबोधनकारांनी चपखलपणे मांडली आहे. समाजपुरुषाचं तोंड म्हणून तो-यात वावरणा-या ब्राम्हणवर्गानं उदरभरणासाठी केवळ भिक्षुकीतच समाधान मानावं आणि समाजधारणेसाठीच मलिन वृत्ती स्वीकारणा-यांना अस्पृश्य समजण्यात त्यांना पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर पशुवत जीवन जगायला लावण्यात धन्यता मानावी अशा दुटप्पी आणि ढोंगी भटभिक्षुकांची प्रबोधनकारांनी या नाटकात यथास्थित हजेरी घेतली आहे.

प्रबोधनकारांच्या सर्वच नाटकातलं सर्वात प्रभावी नाटक म्हणजे ‘खरा ब्राम्हण’. त्यांचा लेखणीचा तळपता स्वैरसंचार या नाटकात आढळतो. त्यांचा सनातन हिंदू धर्माचा गाढा व्यासंग, त्या धर्माची सद्यस्थिती, त्या धर्माचं भवितव्य याबद्दल प्रबोधनकारांनी या नाटकात उत्तम भाष्य केलं आहे. शतकांच्या अन्यायी हक्कामुळे उच्चवर्णीय शिरजोर बनले होते. या शिरजोरांचे अग्रणी असलेला ब्राम्हणवर्ग भिक्षुकीच्या वतनामुळे ताठर बनला होता. 

शतकांच्या लादलेल्या निद्रेतून अनेक कोटी अस्पृश्य खडबडून जागे होऊ लागले होते. त्यांचं जागे होणं सवर्णांना परवडण्यासारखं नव्हतं. माणुसकीच्या समान हक्काच्या प्रत्येक पायरीवर अस्पृश्यांना रक्तपात होईपर्यंत लढावं लागत होतं. बळजबरीचं परिवर्तन कोणालाच सुखावह होत नसतं, आंतरिक परिवर्तन होणं अगत्याचं होतं. या परिवर्तनासाठी म. फुले, आंबेडकर, म. गांधी, स्वा. वीर सावरकर वगैरे सर्व धुरीण ज्या काळात कटिबद्ध झाले होते, त्याच काळात ‘खरा ब्राम्हण’ नाटक सिद्ध झालं. एका संताच्या जीवनावर हे नाटक बेतलेलं असलं तरी चमत्काराच्या कोणत्याही कुबड्या प्रबोधनकार वापरीत नाहीत हे विशेष. भडाग्नी, भम्पकराव आणि चव्हाटेंच्या रूपात इथे ढोंगी ब्रम्हवृंद वावरतो. म्हादबाच्या रूपात अस्पृश्यांवर अन्याय करण्यात ‘हम भी कुछ कम नही’ थाटातला मराठा इथं दिसतो. 

‘थरकत घोडा, भडकत निशाण’ असं पालुपद आळवीत वेडगळासारखा वावरणारा पण संभाविताचं वस्त्रहरण करणारा एक गावबा नावाचा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी इथं आहे. एकनाथ आणि त्यांची पत्नी गिरजा तर माणुसकीच्या न्हाणांत न्हाऊन निघालेली माणूसपणाची गोमटी रूपं आहेत. विठू, महार आणि त्याची तरूण विधवा सून सीता तर अन्याय सहन करणा-या अस्पृश्यांचे प्रातिनिधिक पुतळे आहेत, परंतु प्रबोधनकारांच्या सामाजिक अन्यायाविरूद्ध सर्वंकष आघाड्यांवर लढण्याच्या प्रवृत्तीचं प्रतिक म्हणजे या नाटकात किंचित उपरेपणानं वावरणारं गोव्यातील हिरा नायकिणीचं पात्र. तो गोव्यातील गायक समाजाच्या उठावणीचा काळ होता. 

गोव्यातील उच्चभ्रूंच्या कामवासनेला रूढींच्या नावाखाली शतकानुशतकं बळी जाणारा गोमंतकीय कलावंत समाज संघटित होऊ लागला होता. या समाजाचं अधिवेशन गोव्यात होणार होतं. प्रबोधनकार प्रमुख वक्ते होते. सौंदर्य आणि ललित कलांचा शाप लाभलेली ही शापित जमात धनदांडग्यांच्या आणि वर्णदांडग्यांच्या अत्याचाराला बळी पडून अपमानित चेह-यानं जिणं कंठित होती. विवाहाच्या राजमार्गानं संसार थाटून सन्मान्य नागरिक म्हणून जगण्याचा हक्क या समाजाला हवा होता. या काळात आपल्या ‘खरा ब्राम्हण’ नाटकात गोमंतकीय हिरा नायकिणीचं पात्र उभं करून प्रबोधनकारांनी जे विचार व्यक्त केले आहेत ते नुसतेच पुरोगामी नाहीत तर येणा-या काळाची चाहूल व्यक्त करणारे आहेत. आज गोमंतक मराठा समाज या नावाने हा समाज केवळ कलाप्रांतातच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत केवळ भारतव्यापीच नव्हे तर विश्वव्यापी यश मिळवीत आहे.

प्रबोधनकारांनी अन्य नाटकं लिहिली नसती फक्त ‘खरा ब्राम्हण’ हे एकच नाटक लिहिलं असतं, तरी नाट्यात्म सामाजिक उद्रेकाचे पाईक म्हणून त्यांना कीर्ती लाभली असती. कमावत्या आणि सुशिक्षित बायकोनं हातात बॅग घेऊन नव-याचं घर सोडून जाण्याच्या विलायती नाटकांच्या देशी आवृत्त्या काढण्यात ज्या कालात आमचे नाट्याचार्य आपली सुधारणावादी पाठ स्वतःच थोपटून घेत होते, त्याच काळात प्रबोधनकारांनी संपूर्ण समाजाची पाठ भाजून काढणारं ज्वालामुखीच्या उद्रेकासारख नाटक लिहिलं आहे. त्यांचे काही संवाद तर तप्त लाव्हा रसासारखे भाजून काढणारे आहेत उदारणार्थः-

"सगळे महार, मांग, धेड, चांभार, मुसलमान तरी झाले पाहिजेत नाही तर पेशावरी पठाणांच्या टोळ्या या भटांच्या छातीवर चढल्या पाहिजेत, त्याशिवाय अस्पृश्यांच्या उद्धाराचा तिसरा मार्ग नाही."

"पांढरपेश्यांच्या आचारविचारांत माणूसघाणेपणाची कीड घालणारा देवसुद्धा पापी आहे."

"अडीच तीन कोटी अस्पृश्यांना साध्या माणुसकीनं वागवण्याची अक्कल आम्हाला नसेल तर आमच्या मोक्षाच्या कल्पनांवर सैतानसुद्धा विश्वास ठेवणार नाही."

"अस्पृश्यांच्या हृदयात पेटलेल्या असंतोषाची ठिणगी विझवताना वेळीच प्रयत्न झाला नाही तर तिच्या होळीत ते गुलाम आणि आपण शिरजोर दोघेही जळून खाक होऊ."

हे विचार व्यक्त होऊन आज पाऊणशे वर्षे लोटली. नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, पंढरपूरचा विठ्ठल मंदिराचा दरवाजा सर्वांसाठी खुला करणं वगैरे अनेक चळवळी झाल्या. दरम्यान हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळालं. डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. दलितांना शिक्षणात आणि शासकीय नोक-यांत आरक्षणाचं वरदान मिळालं. दलितांच्या वेदनेचा हुंकार त्यांच्या साहित्यातून उमटला आणि याच काळात दलितांवर अत्याचार होतच राहिले. 

त्यांच्या वस्त्या अजूनही पेटवल्या जात आहेत. त्यांच्या स्त्रियांची अजूनही नग्नावस्थेत सामूहिक धिंड काढली जात आहे! ‘खरा ब्राम्हण नाटकातले भडाग्नी, भम्पकराव चव्हाटे अजूनही नष्ट झाले नाहीत. ‘संभवामि युगे युगे’ प्रमाणेच त्या नतदृष्ट चांडाळांची अवलाद हिंदू धर्माला कलंकित करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म घेतच आहे!

‘खरा ब्राम्हण’ नाटकातील पदांच्या शेवटच्या ओळीत प्रबोधनकारांनी मोठ्या हौसेनं स्वतःचा उल्लेख "रमाकांत" असा केला आहे. ही पदही अभंगाच्या जातकुळीशी मिळतीजुळती आहेत. कटाव आणि हिंदी दोघेही उत्तम आहेत. प्रबोधनकारांचा मिश्किलपणा मधे मधे डोकावतो. सीता महारणीच्या सौंदर्याकडे पाहून भम्पकराव उदगारतो, "वेलांटीनं गोलाटी खाल्ली. नाही तर महारणीची महाराणीच झाली असती." गांवबा म्हणतो, "महाराचा स्पर्श झाला तर ब्राम्हणाचा महार बनतो मग ब्राम्हणाचा स्पर्श झाला तर महाराचा ब्राम्हण का बनू शकत नाही?" असो, अशी उदाहरण द्यावी तेवढी थोडीच.

१९३३ साली रेडिओ स्टार्स या संस्थेतर्फे ‘खरा ब्राम्हण’ नाटकाचा प्रयोग झाला.

पहिल्या प्रयोगापासून गाजत आणि गर्जत असलेल्या या नाटकाचे अल्पावधीतच १००-१२५ प्रयोग झाले आणि प्रथेप्रमाणे ती संस्था फुटली. या नाटकाचे सर्वदूर प्रयोग व्हावेत म्हणून स्वतः प्रबोधनकारांनी पुढाकार घेऊन "डेक्कन स्पार्क्स" या संस्थेची स्थापना केली आणि पाठीवर बि-हाड असलेल्या नटांचं बि-हाडपाठीवर घेऊन स्वतः मालकाची भूमिका निभावीत अनेक अडचणींना आणि चणचणींना तोंड देत या नाटकाचे अनेक प्रयोग केले. 

पैशांशिवाय किराणा दुकानदार शिधा देईना आणि पैसे मिळवण्यासाठी थिएटरमालक थिएटर देईना, अशा विपरित परिस्थितीत हे प्रयोग झाले. निषेध, मोर्चे, धमक्या, बंद्या याशिवाय ‘खरा ब्राम्हण’ नाटकाचा पडदा कधी उघडलाच नाही परंतु नामोहरम न होता, प्रबोधनकारांनी या नाटकाच्या प्रयोगांतून अनेक वावटळी निर्माण केल्या. नाटक मंडळीला एकाच नाटकावर आठवड्याचे सगळे वार गुजरता येत नाही. म्हणून डेक्कन स्पार्क्ससाठी प्रबोधनकारांनी ‘विधिनिषेध’ हे एक नाटक लिहिलं. 

प्रेमविवाह, पुनर्विवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण वगैरे तत्कालिन सामाजिक समस्या या नाटकात खास प्रबोधनकारी रोखठोकपणे उतरल्या आहेत. गर्भपात आणि घटस्फोटाचा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळातली बालविधवांची आणि परित्यक्ता तरूण स्त्रियांची फरफट या नाटकात चितारली आहे. याव्यतिरिक्त एकदोन नाटक त्यांच्या ‘आगामी’ या स्वरूपात जाहिरातीतून झळकताना दिसतात परंतु त्या व्यतिरिक्त काही मिळत नाही.

तर असा हा प्रबोधनकार के. सी. ठाक-यांच्या नाटकांचा धांडोळा! आयुष्यात अनेक वेळा ते नाटकमंडळींच्या छावणीत वावरले. गायकांच्या मैफिलीत जाणकारीनं रमले. स्वतः उत्तम सतार वाजवीत. नटांच्या आणि तालीममास्तरांच्या जवळीकीमुळे त्यांची नाट्यविषयक जाण प्रगल्भ बनली. साहित्यकांच्या काव्य शास्त्र विनोदाच्या बैठकीत सन्मानाने बसले परंतु तरीही त्यांचा पिंड समाजकारण्याचाच होता. त्या आघाड्यांवर त्यांनी लक्षणीय कार्य केल. विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. या प्रचंड कार्याच्या झपाट्यात त्यांच नाटककार असणं झाकोळून गेलं असलं तरी दुर्लक्ष करण्याइतपत त्यांचं नाट्यकर्तृत्व उपेक्षणीय नाही. 

आज काळाच्या ओघात त्यांची नाटकं कालबाह्य झाली असतीलही कदाचित पण त्या नाटकांमधून मांडलेले विचार कालबाह्य झालेले नाहीत आणि म्हणूनच व्यावसायिकतेच्या तराजूत यशाच्या मापट्यानं नाटककार प्रबोधनकारांचं नाट्यकर्तृत्व न जोखता जबरदस्त वैचारिक आंदोलन निर्माण करणारा एक निर्भीड नाटककार म्हणूनच त्यांच्या नाट्यप्रपंचाकडे पाहिले पाहिजे. माझाही प्रयत्न तसाच आहे.

झोपेचं सोंग घेतलेल्या आपल्या ढोंगी समाजाला जाग करण्याचा अहर्निश प्रयत्न करणा-या प्रबोधनकारांच्या कृतार्थ जीवनाची या निमित्ताने त्यांच्याच शब्दातून ओळख करून घेता आली हे माझं भाग्य. ही संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाचा तसेच या प्रकल्पाच्या संपादक समितीचा आणि विशेषतः समितीचे निमंत्रक श्री. पंढरीनाथ सावंत यांचा मनापासून आभारी आहे. 

श्री. सावंतांनी मला प्रबोधनकारांच्या नाटकांबरोबर त्यांचे अनेक ग्रंथ अवलोकनार्थ उपलब्ध करून दिले. लेखनकामासाठी हा माझा व्यवसाय नाही हे जाणून श्री. सावंतांनी मला भरपूर वेळ दिला. मी लिहिलेलं वाचून मला उपयुक्त सूचना केल्या, मला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणांतच राहू इच्छितो.

माझ्या या नव्या भूमिकेचं माझ्या अन्य भूमिकांप्रमाणेच रसिकांकडून चाहत्यांकडून जाणत्यांकडून स्वागत होईल अशी अपेक्षा आहे!