रोखठोक प्रबोधनकार

माधव गडकरी

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना आंदोलनाने एक नेते म्हणून प्रबोधनकारांचे अनेकांनी स्मरण केले. १ मे २०१० च्या दरम्यान ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये छापून आलेला माधव गडकरी यांचा हा प्रबोधनकारांचा परिचयात्मक लेख.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे जसे जनआंदोलन होते. त्याचबरोबर त्यामागे विचारांची पक्की बैठक होती. नेतृत्व करणारे व्यासपीठावर आणि मोर्चात अग्रभागी दिसत होते. सुरूवातीच्या काळात राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्यांचे एक पंचायतन होते. त्याचे अग्रणी होते प्रबोधनकार ठाकरे. सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, पुण्याच्या 'प्रभात' दैनिकाचे संपादक वालचंद कोठारी, माधवराव बागल आणि आचार्य अत्रे अशा पाच जणांचे हे पंचायतन होते. चळवळीच्या वैचारीक नेतृत्त्वाची धुरा या मंडळींनी सांभाळली.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कार्यात समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रबोधनकार ठाकरेंनी भरीव काम केले. पुढील चळवळीसाठी शिवाजी महाराजांचे अधिष्ठानच प्राप्त करून दिले. ठाकरेंची लेखणी आणि वाणी ज्यांनी अनुभवली नाही, त्यांना ती नुसती तिखट होती सांगून कळणार नाही. 'मराठी' हा शब्द ते नेहमीच 'म-हाठी' असे लिहीत.

ठाकरे यांचे भाषण म्हणजे मशीनगनचा मारा असे. लढ्यातील नेत्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ठाकरे यांनाही सार्वजनिक सुरक्षितता कायद्याखाली अटक झाली. तो तुरुंगवास त्यांनी त्या वयातही आनंदाने भोगला. समकालीन राजकारणाबाबत सडेतोड लेखन त्याकाळात त्यांनी केले. आपल्या लिखाणातून त्यांनी महाराष्ट्र जागा केला. वाचकांना चेतवण्याचे काम त्यांच्या लेखनाने त्या काळात आणि त्यानंतरही सातत्याने केले.

महाराष्ट्रनिष्ठा त्यांचा प्राण होती. महाराष्ट्र राज्य आणि मराठी माणूस यासाठी त्यांची लेखणी रणांगणावर लढणा-या वीराप्रमाणे वृत्तपत्रातून लढत होती. निवडणुका, पक्षात जागा, राजकीय पदं यांचा त्यांना कधीच मोह नव्हता. ते म्हणत, 'मी कोणत्याही पक्षपंथांचा पोशिंदा नाही की अनुयायीही नाही. महाराष्ट्रवाद हा माझा अर्धशतकाचा छंद आहे. त्या दिशेनेच मी आजवर लिहीत-बोलत आलो आहे. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले या सेनापती बापटांच्या उक्तीतच माझे जीवनध्येय प्रकटले आहे. ' प्रबोधनकारांच्या लेखणीला जशी तलवारीची धार होती तशीच त्यांच्या वाणीलाही होती. 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' म्हणण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळे त्यांचा चांगलाच दबदबा होता. लोक त्यांना बिचकूनच असायचे.

मार्मिकपणा हे त्यांच्या स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यांच्या तेजस्वी भाषणाने ऐकणा-यांच्यात भीमाचे बळ संचारायचे. विधानसभा निवडणुकीत यशवंतरावांचा विजय झाला तरी ते खचले नाहीत. उलट शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, 'काँग्रेसच्या पेटीत काय आहे? या पेटीत जागोजागी केलेली शिवरायांची बदनामी, भगिनींच्या कुंकवाचे सारवण, पिचलेल्या बांगड्या, एकशे पाच भावांचे रक्त आहे. तिथे तुम्ही आपले मत द्याल काय?' त्यांना सत्तेचा मोह नव्हताच. पण ज्याचे त्याचे माप ठणकावून देण्याच्या वृत्तीने त्यांना सगळेच वचकून असत. 

(माधव गडकरी लिखित 'संयुक्त महाराष्ट्राचे महारथी' या मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकातून आणि कॅ. विलास गुप्ते संपादित सीकेपी बँकेच्या दिनदशिर्केतून साभार)