भेटी लागी जीवा

गंगाधर महांबरे

प्रबोधनकारांविषयीचा हा लेख आहे साहित्यिक गंगाधर महांबरे यांचा. ‘भेटी लागी जीवा’ या पुस्तकात त्यांनी काही व्यक्तिचित्र रेखाटली आहेत. त्यात प्रबोधनकारांचंही व्यक्तिचित्र आहे. ते हे. शिवाय त्यांच्याच ‘साक्षेपी समीक्षा’ या पुस्तकातही प्रबोधनकारांविषयी लिहिलंय.

प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मुंबईत दिनांक २० नोव्हेंबरला मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी प्रबोधनकार पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतानाचे चित्रण दूरदर्शन वर पाहिले आणि मनामध्ये अनेक आठवणीने गर्दी केली. दिनांक २० नोव्हेंबर १९७३ रोजी त्यांचा ८९ वा वाढदिवस त्यांचे आत्मवृत्त ‘जीवनगाथा’च्या प्रकाशनाने साजरा झाला. त्या वेळी मी उपस्थित होतो. त्या प्रसंगी भाषण करताना त्यांनी जे उद्गार काढले होते त्यांचे आजही स्मरण होते. ‘आमच्या जीवनाचे सार्थक झाले, आपण कृतज्ञ आहोत ‘, असे त्या वेळी ते म्हणाले होते.

त्या समारंभानंतर फक्त दोन महिन्यांनीच प्रबोधनकारांचे निधन झाले होते. आयुष्याच्या अखेर पर्यंत त्यांची स्मृती तल्लख होती. आमच्या अखेरच्या भेटीच्या वेळी त्यांनी मला अनेक गोष्टीची आठवण करुन दिली होती. त्यांच्या घरी जऊन मी त्यांचा मराठी टाईपरायटर किती कौतुकाने न्याहाळला, ‘खरा ब्राम्हण‘ या त्यांच्या नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशी दामोदर हॉलच्या रंगपटात कसे प्रयोगाच्या दिवशी एकत्र आलो, ’कलगीतुरा‘ चित्रपटासाठी राजा बढे लावण्या लिहीत असताना शिवाजी पार्कच्या बढ्यांच्या झोपाळ्यावर आमच्या गप्पा झाल्या आणि रात्री भोजनानंतर ते आपल्या नातवाला घेऊन शिवाजी पार्कच्या आयलंडजवळ उभे असताना पत्रकार ह. वि. देसाई आणि मी त्यांच्याशी त्यांचे वारंवार रस्त्यांवरील अपघातासंबधी कसे बोलणे चालत असे, याची त्यांना अद्यापही आठवण होती. 

अशी तल्लख स्मृती त्यांच्याकडे आहे. त्याला ४६७ पानाचेच काय पण चार हजार पानांचेही आत्मवृत्त लिहायला कधीच अडचण आली नसती. प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांचा जन्म पनवेलला एका गरीब धराण्यात झाला. त्यांचे पूर्वज नाशिक जिल्ह्यातील घोलप किल्ल्याचे किल्लेदार होते. तर मूळ घराणे भोर संस्थानीतील पाली गावचे आहे. 

‘रंगो बापूजी‘च्या लेखनाची प्रेरणा त्यांना या पार्श्वभूमीनेच दिली होती. बालपणीच त्यांनी जातीभेदामुळे मानहानी सहन केली, त्यामुळे ते आयुष्यभर कट्टर ब्राम्हणद्वेष्टे म्हणून ओळखले गेले. पण त्यांच्या या (आत्मवृत्तात) असे म्हणणे आहे की, सर्व विहीत कर्तव्य पाळतो तो मला केव्हाही वंद्य आणि पूजनीय असणार. माझे शेकडो स्नेही ब्राम्हणच आहेत. नातेवाइकांपेक्षा माझ्याशी विशेष दिलदारीने वागणारे ब्राम्हण स्नेहीच माझ्या परिसरात नेहमी असतात. कालामानाप्रमाणे आचारात व विचारात झटपट बद्दल करण्याची क्षमता आणि गुणग्राहकता बामणंच्या नव्या पिढीत इतरांपेक्षा खास विशेष आहे.“

प्रबोधनकारांना त्यांच्या मातापित्यांकडून मिळालेली शिकवण थोडक्यात सांगायची म्हणजे वडिलांनी ‘ माणसाने एकमार्गी नसावे, अंगात हुन्नर पाहिजे. पडेल ते काम अंगमेहनतीने पार पाडण्याची शहामत पाहिजे ‘ या शब्दात आणि मातेने ‘ ज्यांचे हस्ताक्षर खराब त्याची दानत खराब , माणसाने कर्तव्यपालनाला कधीही चुकू नये‘ या शब्दात आहे. आलेल्या प्रत्येक प्रसंगाला हिंमतीने तोंड देऊन आपली बुद्धी आणि निष्ठा यांचे जिवापाड जतन करुन त्यांनी अखेरपर्यंत आपले ब्रीद कायम राखले. 

जीवनाच्या वाटचालीत छायाचित्रकार तैलचित्रकार, टंकलेखक, शिक्षक, पाट्या रंगवणारे पेंटर, जिनगर, रबर स्टँप मेकर, ग्रामोफोनच्या भटक्या प्रदर्शक, नाटककार (खरा ब्राम्हण, टाकलेले पोर, विधीनिषेध) पटकथाकार (नलदमयंती, दौपदी, गुपित, कलगीतुरा) अशा अनेक भूमिका पार पाडल्या (‘साक्षेपी समीक्षा‘ या मी लिहलेल्या पुस्तकातील ‘प्रबोधनकार ठाकरे ‘ हा स्वतंत्र लेख जिज्ञासूंनी वाचावा.)

प्रबोधनकार ठाकरे यांचा मित्रपरिवार दांडगा होता. कलांवत व साहित्यिकांमध्ये त्यांचा वावर कसा होता ते त्यांच्या परिचितांच्या पुस्तकातील मनोगतांनी किंवा प्रस्तावनांनी ध्यानात येते. स्वत: टाईपरायटर वापरत असलेल्या प्रबोधनकारांनी ‘टंकलेखन आणि लघुलेखन‘ या कलांचा बळावर आजवर हजारो तरुणांनी आणि तरुणींनीं रोजगाराचा राजमार्ग अवलंबून आपले जीवन सुखी केले. अलीकडे बेकारीचा ओरडाआरडा ऐकू येतो. त्यांनी या दोन कलांकडे स्वाध्यायाची पावले वळवावीत, असा सल्ला दिला आहे. तर पांडुरंग दीक्षितांनी आपल्या ‘आकाशवाणी ‘ या कवितासंग्रहात साहित्य सम्राटांचे आशीर्वादामध्ये प्रबोधनकारांचे परखड शब्द ऐकवताना म्हटले आहे, ‘ बस्स झाल्या या चिठ्याचपाट्या, टाळकं खर्चून काय खरडलंय ते छापून काढ एकदा. एक भाग छापून झाला, दुसरा भाग काढता काढता दोन वर्ष गेली.‘

आचार्य अत्रे निर्मित दिग्दर्शित ‘ श्यामची आई‘ आणि ‘ महात्मा फुले‘ मधील प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या सोप्या पण महत्त्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्या लक्षात राहिल्या आहेत. त्या त्यातील प्रबोधनकारांच्या ठसकेबाज भूमिकांमुळे! आचार्य अत्रे यांच्या ‘क-हेचे पाणी‘ या आत्मचरित्रात प्रबोधनकारांच्या अनेंक गमतीदीर कथा वाचायला मिळतात. त्यात त्यांच्या जणू काही यशस्वी एकपात्री कार्यक्रमाची झलकच पाहायला मिळते. उदारणार्थ ‘खंडाळ्याचे साहित्य संमेलन‘चे वर्णन करताना आचार्य अत्र्यांनी प्रबोधनकारांच्या संदर्भात म्हटले आहे, ‘सगळ्यात केशवराव ठाक-यांच्या काव्यगायनाने बहार उडविली. त्यांनी इंग्रजी काव्य भारतीय संगीताच्या चालीवर म्हणून सर्वांची हसवून हसवून पोटे दुखविली.

‘व्हॉट इज दॅट? यू आर लुकिंग याट्ट‘ हे ‘भक्ती ग वेणी’ या चालीवरील मद्रासीछाप इंग्रजीतले त्यांचे गीत सर्वांना अतिशय आवडले. तथापि, ‘ लग्नाला जातो मी द्वारकापुरा!‘ या सौभद्र नाटकातील नारदाच्या पदाचे त्याच चालीवरील इंग्रजी भांषातर गाऊन त्यांनी धमाल उडविली.

‘ फॉर मॅरेज आय अँम गोइंग टु द्वारका सिटी, हिज सिस्टर गिव्हिंग राम टु कुरु ऑथॉरीटी!‘

प्रा. श्री. म. माटे आणि प्रा. कृ पां. कुलकर्णी यांच्यासारखे गंभीर साहित्यिक तर हसून हसून रडकुंडीला आले. ‘खंडाळ्याचे दुसरे संमेलन‘मध्येही असाच एक किस्सा आहे. त्यात म्हटले आहे की, ‘सहलीसारख्या प्रसंगी केशवराव ठाक-यांसारखा दोस्त नाही. त्या वेळी त्यांच्या गप्पांना आणि नकलांना असे काही उधाण येते की, ऐकणारे हसता हसता गडाबडा लोळू लागतात. ‘त्यानंतर त्यांनी व्याख्यानबाजी सुरु केली. आणि ‘महाराष्ट्राच्या उद्धाराचा मार्ग व्यापारात शिरणे हा नसून व्यापारांच्या पैशावर डल्ला मारणे हा आहे! ‘ असे अनेक ऐतिहासिक पुस्तकाच्या आधारांनी त्यांनी सिद्ध करुन दाखविले. इंग्रजीतल्या ‘एंट्री’ च्या वेळी टणाटणा उड्या मारताना पाहून प्रा. कृ. पा. कुलकर्णी ओरडले, ’अहो, या माणसाला साठ वर्षाचा कोण म्हणेल? हा सोळा वर्षाचा एक तरणाबांड छोकरा आहे छोकरा!’

आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणी सांगताना त्यांचे चिरंजीव, सुप्रसिद्ध संगीतकार श्रीकांत ठाकरे म्हणतात “ प्रबोधन’ या पाक्षिकाचे संपादन आणि लेखन आमचे दादा करायचे म्हणून त्यांना लोक प्रबोधनकार ठाकरे असे म्हणू लागले. माझा जन्म कलेसाठी झाला, हो तबला आणि सतार ही वाद्ये सुंदर वाजवणा-या माझ्या वडिलांनी ओळखलं होत. लहानपणी मला खूप वेळ फिटस् येत असत. 

एकदा असाच मी बेशुद्ध पडलो, तेव्हा दादांनी घराजवळच राहणा-या डॉक्टरांना बोलवण्याऐवजी घराजवळ राहणा-या सुखलाल गुजराती नावाच्या व्हायोलिनवादकालाच बोलवणं पाठवलं. सुखलाल आल्यावर त्याला त्यांनी शेजारी बसवलं आणि व्हायोलिनवर भैरवीचे आलाप छेडायला सांगीतलं. काही क्षणातच त्या औषधानं मी बरा झाल्यावर दादा म्हणाले, ‘ ही इज म्युझिशिअन, संगीत हेच त्याचे औषध आहे. हे त्याला मिळत नसावे म्हणून तो सारखा आजारी पडतो.’ मी मोठा झाल्यावर दादांनी चितामणरावपंत वैद्यांची मला व्हायोलिनची शिकवणी ठेवली आणि ‘फेमस‘ला चिठ्ठी देताना लिहले की, ‘त्याची व्हायोलिनची परीक्षा घ्यावी. चांगला वाटल्यास ठेवावे नाहीतर जायला सांगावे.’