प्रबोधनकार माफी असावी!

ज्ञानेश महाराव

प्रबोधनकारांच्या लेखणीचा वारसा चालवणारे मराठीतील अग्रगण्य पत्रकार, म्हणजे साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव. प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त त्यांनी चित्रलेखाच्या स्तंभात आजच्या संदर्भात केलेलं प्रबोधनकारांचं हे स्मरण, जे सगळ्यांनाच अंतर्मुख करणारं आहे.

आज (17 सप्टेंबर) तुम्ही असता तर वयाची सव्वाशे गाठली असती. ही जर-तरची बात झाली. पण ज्या काळात सतत असलेलं दुष्काळाचं सावट, आर्थिक कुचंबणा, जीवघेण्या साथींच्या रोगांचे फेरे यांचाच भडिमार होत होता, अशा काळातले तुम्ही! तरीही तुम्ही विचारबळाने आणि कृतिशील विचाराने वयाची नव्वदी गाठलीत. वयाच्या नवव्या वर्षी ह. ना. आपटे संपादित 'करमणूक'मधून 'छत्रीची उत्पत्ती' या माहितीपर टिपणातून प्रसिध्द झालेली तुमची लेखणी अखेरपर्यंत अन्यायाचा, असत्याचा समाचार घेण्यासाठी तलवारीसारखी चालली. साथीला परखड वाणीचा दांडपट्टा होता. 

तो एक घाव आणि अनेक तुकडे करणारा होता. तुमच्याच शब्दांत सांगायचं तर 'अडकित्त्यात सुपारी आली की ती फोडायचीच! त्यात लेखणी हाती असली, की जो कोणी समाजहिताच्या आणि माणुसकीच्या आडवा येईल, त्याला उभा सोललाच समजा!' अशी तुमची कडवी वृत्ती होती. तर 'ज्याची लंगोटी साफ, तो कुणाला भिणार!' असा तुमच्या सत्यनिष्ठेचा टणत्कार होता. आपल्या या कडव्या, प्रखर निश्चयाने देव-धर्माच्या नावानं सोकावलेल्या अमानवी सामाजिक रूढी-परंपरांचा समाचार घेतलात. त्यासाठी वर्ण्यवर्चस्ववादी भटी हरामखोरी उघडयावर आणलीत. ह्या जातीनिष्ठ भटी हरामखोरीला तुम्ही 'भिक्षुकशाहीचे बण्ड' म्हटलंत. हे बंड 'उघडया डोळयांनी पाहाणा-याला हिंदुस्थानच्या स्वराज्यप्राप्तीची मुदत सात महिन्यांवरून सात शतकांवर न्यावी लागेल. गुलामगिरी...मग ती शारीरिक असो वा मानसिक असो, ती महारोगासारखीच व्याधी आहे. या व्याधीत खितपत पडलेल्या राष्ट्रांना व समाजांना आपल्या दुष्कर्माची घाणच येत नाही.

इतर अवयवांप्रमाणे त्यांची विवेकबुध्दीसुध्दा बधिर व आंधळी होते. त्यात बौध्दिक गुलामगिरी ही दृश्य नसल्यामुळे तींत बुजबुजणा-या अनेक किडयांचा सुळसुळाट गुलामी मनोवृत्तीच्या माणसांना भासत नाही.' हे 'अंधश्रध्देचं जालीम जहर' लोकजीवनात बाळंतिणीच्या खोलीपासून ते स्मशानातील सरणापर्यंत भट-भिक्षुकांनी स्वार्थी पोटासाठी कसा पेरलाय, त्यासाठी देव-धर्माचा वापर कसा केलाय; ते प्रबोधनकार तुम्ही सविस्तर सांगितलंय. त्यासाठी तुम्ही 'जगद्गुरू म्हणजे कारस्थानी भिक्षुकशाहीच्या हातची मेणाची बाहुली' असून 'शंकराचार्यांसारख्या निःसत्त्व दण्डधारी कर्महिनांच्या सत्तेला वास्तविक केव्हाच मूठमाती द्यायला पाहिजे होती. परंतु तेहतीस कोटी देव निर्माण करून दर माणसांच्या बोकांडी एकेक स्वतंत्र देव बसवणा-या भिक्षुकशाहीची सत्ता जोपर्यंत हिंदूजन झुगारून देणार नाहीत, तोपर्यंत ही पीठाची बाहुली सट्टयाचा बाजार चालू ठेवणारच!' हे ठणकावून सांगितलंत. ज्याकाळात सोवळेधा-यांचा सुळसुळाट होता, पंक्तिभेद, जातिभेद, अस्पृश्यता पाळली जात होती; त्याकाळात प्रबोधनकार तुम्ही माणसाला गुलामीच्या गुंगीत गुंतवणा-या भट-भिक्षुकांच्या जातिनिष्ठ हरामखोरीचं मर्म-वर्म सांगितलं. त्यावर प्रबोधनाचे ठोसे लगावलेत. पत्थरी देव-धर्माचं भूत ब्रह्मदेवाच्या बेंबीतून नव्हे, तर ब्राह्मणांच्या पोटातून निर्माण झाल्याचं तुम्ही नाना पुराव्यांसह दाखवून दिलंत. 'देवळांचा धर्म, धर्माची देवळे' या पुस्तिकेत, 'या देशातला तरुण स्वयंप्रज्ञेने उभा राहील, तेव्हा त्याच्या विचारांचा पहिला हातोडा देवावर आणि देवळांवर पडेल,' असा आशावाद तुम्ही बोलून दाखवलात. १९१९मध्ये प्रकाशित झालेला हा आशावाद आहे.

दरम्यानच्या ९० वर्षांत विज्ञानाने माणसाचं जीवन किती सुसह्य केलंय. चमत्कार-रहस्य वाटणारी अनेक कोडी उलगडली. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने तर बिघडलेल्या मेंदूला ठिकाण्यावर आणण्याचं आणि हृदयाला बायपास करण्यापर्यंत मजल मारलीय. विज्ञानामुळे माणूस सागराचाच तळ गाठतो असं नाही, तर जमिनीखाली शेकडो किलोमीटर जाऊनही सुरक्षित राहू शकतो. भारतीय माणूस चंद्रावरही गेला. पण समस्त भारतीयांच्या अंधश्रध्देचं ग्रहण अजून काही सुटलेलं नाही. किंबहुना, त्यात वाढ होताना दिसते. सभा-मोर्चांना, आंदोलनांना भाडोत्री लोक आणावे लागावेत, अशी आज परिस्थिती आहे. पण 'जागृत' पत्थरी देवदर्शनासाठी आणि अवतारी परमपूज्यांच्या कृपाप्रसादासाठी लोक लाखोंच्या संख्येने आपसूक जमतात. मुंबईत सध्या गिरणगावातल्या 'लालबागचा राजा'चा बडा बोलबाला आहे. 

हा सार्वजनिक गणेशोत्सव गेली ५० वर्षं सुरू आहे. गेल्या तीस वर्षांत या परिसरातील कापड गिरण्या बिल्डर व मॉलवाल्यांनी राजकारण्यांशी संगनमत करून गिळल्या. तिथे गगनचुंबी टॉवर उभे राहिले. कामगार मात्र कुटुंबासह उद्ध्वस्त झाला. त्यावेळी हा 'लालबागचा राजा' काय करत होता? अरे, जसा तू सुखकर्ता, तसा तू दुःखहर्ता, संकट निवारक ना तू? मग लाखो कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना, केवळ पाहात राहाण्याची सुपारी घेतली होतीस का रे 'लालबागचा राजा'? असे प्रश्न दर्शनाच्या रांगेत पंधरा-वीस तास उभं राहाणाऱ्या सुशिक्षितांनाही पडत नाहीत. प्रश्न श्रध्देचा आहे, तसा बुध्दीचाही आहे. पण बुध्दिदात्याच्या 'जागृत'तेची तपासणी करण्यासाठी बुध्दी चालवणारा थेट धर्मद्रोही ठरतो. हा भटीविकार त्याचे गुलाम झालेल्यांनीही सध्या सोयीस्करपणे वापरायला सुरुवात केली आहे. 

अशा विकार-वृत्तीलाही आजकाल प्रबोधन म्हटलं जातं. अशा चालूगिरीविरोधात तुम्ही लोकभावनेची फिकीर न करता संघर्ष केलात, आणि 'प्रबोधनकार' ही उपाधी सार्थ ठरवलीत. पण त्या उपाधीचा लोकजीवनात साक्षात्कार घडवण्यात तुमच्या रक्ताचे जाऊ देत; तुमच्या सहवासाचं गुणगान करणारेही कुचकामी निघाले; त्याचं काय? या उफराटीचा अंदाज तुम्हाला असावा. म्हणूनच तुम्ही (१९३९मध्ये प्रकाशित झालेल्या) प्रस्थान या लेखसंग्रहात लिहिलंत, 'प्रबोधन संप्रदाय अजून अस्तित्वात आलेला नाही. त्याला पक्ष, पंथ, पार्टी काही नाही. तो स्वतंत्र मतवादी आहे. स्पष्टच बोलायचं तर ही एक खांबावरची द्वारका आहे. खांब आहे तोवर द्वारका, पडला की त्याच्या कार्याच्या एकजात खारका!'

आपलं कार्य, त्यासाठी केलेला संघर्ष, खाल्लेल्या खस्ता मातीमोल झाल्या तरी बेहत्तर; पण आपण वर्तवलेलं हे आपल्या कार्याचं भविष्य खोटं ठरू नये, ह्याची काळजी भटशाहीने आणि त्याच्या गुलामांनी पराकोटीने घेतली आहे. भट-भिक्षुकशाही आपली स्वार्थी हरामखोरी, खोटेपणा उघडयावर आला की, स्वतःला आवरतं घेते आणि वेळवखत पाहून समाजाला देव-धर्माच्या खुळाची लालूच दाखवून आपल्या गुलामीचा डंख मारते. हे समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात चालतं. भिक्षुकशाहीच्या या हरामखोरीला हिंदूतर धर्मही अपवाद नाहीत. अयोध्येतल्या मंदिर-मशीद वादानंतर भारतात सर्वच क्षेत्रातल्या भिक्षुकशाहीने उचल खाल्ली. पडिक-दुर्लक्षित देव-देवळं जागृत झाली. वास्तुशांती, वास्तुशास्त्राचा बनाव आला. 

नारायण नागबळीसारख्या लूटमार विधीचं स्तोम माजलं. 'वैभवलक्ष्मी'चं व्रत आलं. गणपतीच्या मूर्ती दूध पिण्याचा चमत्कार झाला. विद्यापीठात नामवंत वैज्ञानिकांनी गैर ठरवलेलं 'ज्योतिषशात्र' थापण्याचा प्रयोग झाला. शिवसेनाप्रमुखांच्या हृदयाचं ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 'मृत्युंजयजपयागा'चं आयोजन झालं. वाजपेयी सरकार टिकून राहाण्यासाठी संसद भवनाच्या जवळ यज्ञ करण्यात आला. 'विश्वशांती यज्ञा'ने लुटमार झाली. आयटीवाल्यांच्या हातातही पिवळे-लाल दोरे दिसू लागले. गणपतीचं मार्केटिंगही जोरात झालं. सुपरस्टार अमिताभ बच्चन प्रभादेवीच्या सिध्दिविनायकला सहकुटुंब अनवाणी चालत गेल्यापासून तिथे लाखोंच्या संख्येने वाढ झाली. तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज यांच्याही 'बुलाव्या'चं प्रस्थ वाढलं. 'हे सगळं देशात जे दहशतीचं, असुरक्षिततेचं सावट आहे, त्यातून मनःशांती मिळण्यासाठी होतं,' अशी पोपटपंची मीडियातून होऊ लागली. 

तथापि, हा 'भट्ट सांगे आणि मठ्ठ ऐके' असा प्रकार आहे, हे सत्य कुणी सांगत नाही. कारण 'बहुजन समाजाला परावलंबी परप्रत्ययनेय स्थितीत अडकवून ठेवून आपला स्वार्थ साधणं,' हा भट-भिक्षुकांचा सनातन उद्योग आहे, हे प्रबोधनकार तुमचं म्हणणं भटी उद्योगाच्या रखवालदारांनी आणि त्यांच्या मीडियामास्टर्सनी संदर्भासाठीही वापरण्याचं कारण काय? ते एकवेळ संदर्भासाठी अनाकलनीय मार्क्स, रसेल यांची 'अवतरणं' वापरतील. नाइलाजाने समदृष्टी दाखवण्यासाठी फुले-आंबेडकरांची साक्ष काढतील. पण प्रबोधनकार ठाकरे 'दीनमित्र'कार मुकुंदराव पाटील, क्रांतीवीर नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील आदिंचे भटी बदमाषी दाखवणारे संदर्भ अजिबात देणार नाहीत. कारण काय, तर भट-भिक्षुकशाहीला दिलेले प्रबोधनी तडाखे ब्राह्मणविरोधी ठरतात म्हणून! त्यामुळे प्रबोधनकार, तुम्ही केलेला मानसिक गुलामीविरोधी संघर्ष कुणा एका जाती-धर्माविरोधात नसूनही समस्त हिंदूजनांच्या संघटनांसाठी; त्यांच्या स्वाभिमानासाठी, उध्दारासाठी तुमचा विचार तर नाहीच; पण तुमचं नावही घेतलं जात नाही. 

कारण भटी विचार चालवणा-यांशी आणि त्यांच्या मीडियातील बगलबच्चांशी फुकाचा पंगा नको. त्यापेक्षा देवा-धर्माच्या नावानं हिंदूत्व घुमवलं आणि बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वीवर फुलं उधळली, तरी हवं तसं राजकारण रेटता येतं. या खोटया व्यवहारात 'देव-धर्म-देवळे-मठ यांच्या आश्रयाने ब्रह्मचा-यांचे वंश वाढतात कसे? विधवा पतिव्रता पुत्रवती होतात कशा? गोसावडे सावकारी करतात कसे? मठात गुरू-महाराजांचे गोकुळ नांदते कसे?

गोळीला तुम्ही, पोळीला आम्ही हा भट-ब्राह्मणाचा सनातनी उद्योग चालतो कसा?' याची तुम्ही केलेली चिरफाड वाचा म्हणून सांगायचं कुणी आणि कशाला?

आपुल्या पित्याची आपणचि सांगे कीर्ती अशी नाक मुरडणी कुणी करू नये, म्हणून बाळासाहेबांनी शक्य आणि आवश्यक असूनही तुमच्या विचार-साहित्याचा प्रचार करण्याचं टाळलं असेल. पण जे स्वतःला पुरोगामी, डावे, हिंदुत्वविरोधी, अंधश्रध्दा निमूर्लक म्हणवतात, त्याचं काय? त्यांनाही तुमचं नाव घेताना दातखीळ बसते? लिहिताना पेनातली शाई संपते? कॉम्प्युटर हँग होतो? का त्यांच्यातील जातीनिष्ठता 'बण्ड' करते? तुम्ही इतिहासाचार्य (?) वि. का. राजवाडे यांनी कायस्थांना शिवरायांचे शत्रू, स्वराज्यद्रोही, संभाजीराजांचे खूनी ठरवताच; राजवाडेसकट त्यांची पाठराखण करणा-या भारत इतिहास संशोधक मंडळाविरोधात 'कोदंडाचा टणत्कार' ओढला आणि ब्राह्मणी वर्ण्यवर्चस्वासाठी इतिहासातही कोणकोणत्या खोटया घुसखो-या केल्या, ते उदाहरणांसह जगजाहीर केलंत. 

ते जातीसाठी मती चालवणारं नव्हतं; तर तो संशोधनाचा अस्सल टणत्कार होता. 'ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास'मधूनतुम्ही पेशवाईने माजलेल्या ब्राह्मणी विकृतीची शिरजोरी सांगितलीत. ते सांगताना 'क्षत्रियांची बदनामी करणारे खोटे दस्तऐवजी पुरावे स्मृतिपुराणी ग्रंथात स्वार्थी ब्राह्मणांनी घुसडण्याच्या वेळीच जर ब्राह्मणांच्या नरडयावर क्षत्रिय बसले असते, तर आज त्यांना शुद्र शुद्र असे ब्राह्मणांनी धिःकाराने म्हणताच, त्यांच्या खाडकन् मुस्कटात भडकवण्याचा अतिप्रसंग टळला नसता काय?' या तुमच्या विचारानेच जेम्स लेनच्या माध्यमातून शिवरायांची आणि जिजाबाईंच्या चरित्राची विटंबना होताच, अस्सल शिवप्रेमी कृतिशील झाले. लेनला वापरणा-यांच्या हरामखोरीचा त्यांनी समाचार घेतला. तुम्ही इच्छिल्याप्रमाणे ते कुणाच्या नरडयावर बसले नाहीत, तरीही त्यांच्या नावानं ब्राह्मणद्वेषी असा गिल्ला करण्यात आला. अशा कांगावखोरांच्या सुरात सूर मिसळणारे जागृत क्षत्रियही असावेत, ह्याला तुमच्या प्रबोधनी टणत्काराला दिलेली 'उलटी सलामी'च म्हटली पाहिजे. प्रबोधनकार, तुम्ही म्हणाल, त्यात काय नवं आहे? विपरित वागणं, गि-हाईक बनून जगणं, ही लोकांची सनातन खोड आहे.

तुम्ही अखेरच्या भाषणात, 'माझी जीवनगाथा' या प्रकाशन समारंभात म्हटलं होतं, 'स्त्रिया आता खूप शिकल्या. खूप पुढे गेल्या. रूढी-परंपरेत त्याचा विकास खुंटून राहिला होता. पण त्यांनी आता इतकं पुढे जावं की, पुरुषांना वाटलं पाहिजे की, स्त्रिया आपल्यावर सूड उगवत आहेत.' 

तुमच्या या आशावादानेही स्त्रियांना भटी छूमंतरच्या धुपा-याने सॉफ्ट टार्गेट करणारे पुरुषसत्ताकवादी सावध झाले असावेत. तुम्ही 'भिक्षुकशाहीचे बण्ड' या ग्रंथाच्या अखेरीस भट-ब्राह्मणांच्या भेज्यात काय रटरटत असतं ते सांगताना म्हटलंय, 'जावत्काल हिंदूसमाजातील स्त्रीवर्ग आम्हा भिक्षुकांच्या भजनी लागलेला आहे, तावत्काल आमच्या भिक्षुकशाहीचे वर्चस्व हाणून पाडण्याचे यत्न जेहेत्ते फोलच होणार!' आपला हा मर्मवेध आजही सत्यात उतरताना दिसतो. स्त्रिया शिकल्या. विविध क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीनं काम करताना त्या दिसतात. राजकारणात, समाजकारणातही मोठया पदावर आहेत. राष्ट्रपतीही आहेत. अवकाशात भरारी मारण्यातही त्या यशस्वी झाल्या आहेत. 

असं असूनही त्या मोठया प्रमाणात भटीपाशात अडकल्या आहेत. नुकतंच पुण्याच्या 'श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती'च्या उत्सवात २५ हजार महिलांनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केलं. त्याला प्रसार माध्यमांनी विराट स्त्री शक्ती, महागणेशभक्ती अशी विशेषणं लावून प्रसिध्दी दिली. कुठल्याही गर्दीला भक्ती-शक्तीचा टिळा लावून त्यातल्या भाबडेपणाची भलामण करण्याचा मीडिया हव्यास, रोग म्हणावा इतका बळावलाय. परिणामी, अथर्वशीर्ष पठणच्या सामुदायिक उपक्रमाला प्रसिध्दी देताना तारतम्याचा अभाव दिसला. किंबहुना, त्याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलं जातं असावं. अथर्वशीर्ष पठण हा श्रध्देचा विषय जरूर आहे. पण त्याचं जाहीरपणे सामुदायिकरीत्या पठण करण्याचं कारण काय? अथर्वशीर्ष हा अथर्ववेदाचाच एक भाग आहे. 

त्यात गणपतीचं परब्रह्मस्वरूप विषद करण्यात आलंय. या अथर्वशीर्ष शब्दातील 'अ'चा अर्थ आहे 'अभाव'. 'थर्व' म्हणजे 'अस्थिर'; आणि शीर्ष म्हणजे डोकं! चंचलपणाचा अभाव असणारं डोकं म्हणजे बुध्दी तयार करणे म्हणजे अथर्वशीर्ष! ह्याचा अर्थ, ज्याची मन-बुध्दी अस्थिर-चंचल आहे; स्पष्टच सांगायचं तर ज्याचं डोकं ठिकाणावर नाही, अशांच्या दुरस्तीसाठी अथर्वशीर्ष आहे. ह्याचा अर्थ, सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी संघटित शक्ती दाखवणा-या महिलांचं डोकं ठिकाणावर नव्हतं, असं म्हणणं साफ चुकीचं आहे. तथापि, अथर्वशीर्षचा अर्थ न समजून घेता त्याच्या सामुहिक पठणातून आपल्याभोवतीच्या भटीपाशाचं प्रदर्शन मात्र स्त्रियांनी घडवलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुशिक्षित, स्त्रिया मोठया प्रमाणावर होत्या. मोठया हुद्याची जबाबदारी पेलणा-या तरुणी होत्या.

परंतु त्यांना, प्रबोधनकार तुम्ही जो स्त्रियांच्या शोषणाविरोधात विचारांचा जबरदस्त सोटा चालवला, तो त्यांना ठाऊक नसावा. 'स्त्रियांच्या परवशतेचा, राष्ट्रदेवतांच्या गुलामगिरीचा, आमच्या माताभगिनींच्या बौध्दिक अधःपाताचा प्रश्न स्वच्छ सुटल्याशिवाय भिक्षुकशाहीचे बण्डसुध्दा पुनःपुन्हा उपटल्याशिवाय राहाणार नाही!' हा इशारा तुम्ही ८० वर्षांपूर्वी दिलात. तेच वर्तमान असावं, त्याची साक्ष महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणातून मिळावी, ही विचारी मनाला शरमिंदं करणारी घटना आहे. प्रबोधनकार, अशा घटना तुमच्या हयातीतही होत होत्या. पण तुमच्या लेखणी-वाणीत समाजमनाला भानावर आणणारी ताकत होती. या ताकतीला राजर्षि शाहू महाराज, भास्करराव जाधव, भाऊराव पाटील, नाना पाटील, माधवराव बागल, यांच्याप्रमाणे सत्यशोधक कार्यकर्त्यांची, शोषित कष्टकरी जनतेची मोठी साथ होती. 

आज समाजाला भूलथापा मारून त्यांना स्वार्थी राजकारणासाठी गुंगवणा-यांची चलती आहे. त्यांचं मार्केटिंग करणारेही आहेत. अशा वातावरणात गरज असूनही तुमच्या विचारांचा प्रसार कुणी करायचा? स्पष्ट सांगायचं, तर बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय ओळख आहे म्हणून तुमचं नाव तरी घेतलं जातं. तुमच्यासारखंच विचार-कार्य करणा-या महात्मा फुलेंचे अनुयायी कृष्णराव भालेकर, ताराबाई शिंदे, मुकुंदराव पाटील, केशवराव विचारे, भगवंतराव पाळेकर, दिनकरराव जवळकर, रामचंद्र जाधव उर्फ 'दासराम,' वीर माहिते, गुरुवर्य कृष्णराव केळुसकर, श्रीपतराव शिंदे, सावित्रीबाई रोडे आदिंची नावं कुणाला ठाऊक आहेत का? क्रांती आपली पिल्लं खाते, असं म्हणतात. पण आपल्या देशाचा न्याय याबाबतीतही उफराटाच आहे. ज्यांनी समाज सुधारणेसाठी खस्ता खाऊन, समाज विकास घडवून आणला, त्या विकासाच्या लाभार्थीनीच सुधारकांना, क्रांतिकारकांना विस्मरणाच्या आवंढयात गिळंकृत केलंय.

प्रबोधनकार, आपण पाच नाटकं लिहिलीत. त्यात साहित्यिक छचोरपणा नाही. त्यातही सामाजिक समस्यांचा आणि त्यांची उकल करण्याचा ध्यास काटोकाट भरलेला आहे. त्यापैकी 'संगीत विधिनिषेध' हे धर्म, सामाजिक रूढी-परंपरां आदिच्या नावानं चालणा-या विधींचा निषेध करणारं नाटक आहे. (प्रकाशन १९३४) त्यात तुम्ही क्रांती, शांती, विवेक, कावळे, बावळे, सनातने अशा नाव-आडनावातच त्यांची ओळख सांगणारी पात्रं निर्माण केली आहेत. त्यातील क्रांती विवेकला ऐकवते, 'देश? कुठला देश? या देशानं माझ्या जीवनाची जबाबदारी पत्करली आहे का? मग कुणासाठी, कशासाठी या क्रांतीनं या देशात जगण्याची व्यर्थ धडपड करावी? 

मायेच्या उमाळयानं क्रान्ती ये म्हणून मला जवळ करणारा, आपुलकीच्या मायेनं पोटाशी धरणारा, एक तरी जिता जीव या मोठी वस्तीच्या देशात तुम्हाला दिसतो का?' त्यावर विवेक तिला समजावत म्हणतो, 'मला तुझ्या या करुणास्पद स्थितीची कल्पना आहे. पण जोवर आपण हिंदुस्थानात न् हिंदू समाजात वावरत आहोत-नव्हे, वावरल्याशिवाय सुटकाच नाही-तोवर तुझ्या या स्थितीला उपाय काय?' त्याची ही हताशा साफ करताना शांती म्हणते, 'युरोप अमेरिकेची सफर करून आलेल्या तुझ्यासारख्या तरुण विद्वानात सुध्दा असले निराशेचे उद्गार! पेसिमिझम्-निराशा हाच हिंदू संस्कृतीचा पिंड दिसतो.' प्रबोधनकार, तुमच्या या नेमक्या संवादात धनाने, मनाने आणि अकलेनेही श्रीमंत होऊनही भटी व्यवस्थेपुढे लाचार होणा-या भारतीयांच्या मानसिकतेचं सार आहे. तुमच्या नाटकातील क्रांती गाण्यातून आपलं मन मोकळं करताना म्हणते-

झुरत सतत मनी। क्रान्त क्रान्ति ही

जीवन कसले। रसाभावी 

या अशीच अवस्था तुमच्या विचारांनी झपाटणा-यांची असताना, तुमच्या सत्य परमोधर्माः या ब्रीदाशी प्रामाणिक राहून सांगतो; प्रबोधनकार माफी असावी, तुम्ही आता नावापुरते आहात आणि तसबिरीतून दिसण्यापुरते आहात! तुमचं विचार-कार्य शासकीय प्रकाशनाच्या पाच खंडी ग्रंथांत बंदिस्त आहे. पत्थरी देव-देवता जागृत झाल्यावर तुमच्यासारख्या प्रबोधनकाराच्या वाटयाला दुसरं काय येणार? आजच्या तरुण पिढीचं हे दुर्दैव आहे.