आज प्रबोधनकारांनी आग लावली असती

- अमर हबीब, अंबाजोगाई

इतिहासापासून सिनेमा पटकथेपर्यंत सर्वत्र संचार करणाऱ्या प्रबोधनकारांच्या लेखणीने शेतकऱ्यांविषयीही मोठ्या तळमळीनं लिहिलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांचं पुस्तक ‘शेतकऱ्यांचे स्वराज्य’ खूप मोलाचं आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अमर हबीब यांचा या पुस्तकाची ओळख करून देणारा हा विशेष लेख.

केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘शेतकर्‍यांचे स्वराज्य' हे पुस्तक १९१९ साली प्रकाशित झाले. १२७ पानांच्या या पुस्तकात आठ लेख आहेत. आठही लेख शेतकर्‍यांच्या दुर्दशेचे वर्णन करणारे, कारणांचा शोध घेणारे, शेतकरीविरोधी भूमिकांचा पर्दाफाश करणारे आणि उपायांबद्दल चिंतन करणारे आहेत. शेवटच्या लेखाचे शीर्षक ‘शेतकर्‍यांचे स्वराज्य' असे आहे त्यावरूनच या पुस्तकाचे नाव ‘शेतकर्‍यांचे स्वराज्य' असे ठेवण्यात आले आहे.

प्रबोधनकारांचा जन्म १८८५ चा. ऐन उमेदीच्या काळात म्हणजे तिशी-पस्तीशीचे वय असताना त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांचे वय आणि व्यासंग यांचा विचार केला तर त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची साक्ष पटते. विशेष म्हणजे प्रबोधनकारांच्या मनाची बैठक कशी होती ती या पुस्तकातून उलगडते.

१९२६ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक तब्बल ८० वर्षांनंतर माझ्या हाती पडले. हे पुस्तक तथाकथित ‘बैठ्या' विचारवंताने वा निष्क्रीय पंडिताने लिहिले असते, तर ते मी एवढ्या उत्साहाने ते वाचले नसते. या पुस्तकाचे लेखक संवेदनशील कार्यकर्ता आहेत. त्यांचे विचार त्यांच्या आचाराशी सुसंगत आहेत. त्यांची जशी आगळीवेगळी जीवन शैली आहे, तशीच त्यांची खास प्रकारची धारदार लेखनशैली आहे. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस त्यांच्यात आहे, जग बदलण्याची उर्मी आहे, त्यासाठी ते सक्रीय आहेत. सर्वस्व झोकून देणारी वा आयुष्याची किंमत मोजणारी माणसे दुर्मिळ असतात. अशा माणसांचे विचार अंतःकरणातून उमटतात. ‘शेतकर्‍यांचे स्वराज्य' या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात असलेला, शेतकर्‍यांविषयीचा कळवळा, ओतप्रोत भरला आहे. शेतकरी आंदोलनातील एक कार्यकर्ता म्हणून मला हे पुस्तक खूप मोलाचे वाटते.

सुमारे शंभर वर्षापूर्वीचे हे पुस्तक. इंग्रज येऊन स्थिरस्थावर झाले आहेत. ते जातील असे वाटत नाही. अशा काळात भटशाही इंग्रजांच्यापासून लाभ मिळविण्यासाठी उतावीळ झालेली. मुंबईत औद्योगिकीकरण सुरु झालेले. खेड्यापाड्यातील शेतकरी रोजगारासाठी मुंबईला येत आहेत. लेखक त्यांचे आयुष्य न्याहाळतो. त्यांची परिस्थिती पाहून अस्वस्थ होतो. त्या माणसांचा प्रचंड कळवळा लेखकाच्या मनात दाटला आहे. कोल्हापूर संस्थानात छत्रपती शाहू महाराज ब्राह्मणेत्तर चळवळीच्या पाठीशी उभे राहिलेले. ब्राह्मणेत्तर चळवळ ही शेतकर्‍यांच्या जागरणाची पहिली चळवळ होती असा या लेखकाचा दावा. या चळवळीच्या पाठीशी  राजर्षी शाहू महाराज उभे राहिले म्हणून ते त्यांचा गौरव करतात. परंतु महाराजांच्या पश्चात ज्या मराठ्यांनी पोळी भाजून घेतली त्यांना ते फटकारतात.

पुण्यात लोकमान्य टिळक ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' अशी घोषणा करतात परंतु शेतकर्‍यांशी त्यांना काही देणे घेणे नाही, असे स्पष्ट शब्दात लिहितात. गांधीजींचे भारतात आगमन झालेले. स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व त्यांच्या हातात. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाला लेखकाचा विरोध आहे. गांधीजींच्या या भूमिकेचा ते चांगलाच समाचार घेतात. टिळक-गांधी त्यांना भोंगळ वाटतात. ही मंडळी ‘भटां'च्या सोयीची आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, दिनकरराव जवळकर या तिघांबद्दल मात्र ते भरभरून लिहितात. जोतिबांच्या लिखानाबद्दल प्रबोधनकारांना नितांत आदर आहे. शाहू महाराजांच्या भूमिकेचे ते स्वागत करतात. दिनकरराव जवळकरांनी शेतकर्‍यांविषयी जे विचार मांडले व कार्यक्रम दिला त्याबद्दल प्रबोधनकार त्यांचे कौतुक करतात. त्या काळातील भटशाहीला, काँग्रेस नेत्यांच्या भोंदूपणाला झोडपून काढतात.

परिस्थितीचे चपखल वर्णन करताना प्रबोधनकार म्हणतात, ‘गेल्या ५० वर्षांच्या राष्ट्रीय चळवळीची फलश्रुती आणि ब्रिटीशांच्या शंभर वर्षे राज्यकर्तृत्वाची पुण्याई काय? तर उभा हिन्दुस्थान भणंग भिकारी बनला.' प्रबोधनकारांनी पहिल्या प्रकरणात इतिहासाचा आढावा घेतला आहे. त्यात इंग्रजांच्या पूर्वी हिन्दुस्तानी शेतकरी किमान दाण्याला तरी मुकत नसे, इंग्रजानी सत्यानाश केला, अशी मांडणी केली. वस्तुस्थिती काय होती? सत्ताधीश देशी असो की विदेशी, शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळच असतो. इंग्रजांपेक्षा पूर्वीची राज्यकर्ते चांगले होते, असे म्हणणे रास्त ठरत नाही. प्रत्येक राज्यकर्त्याने आपल्यापरीने शेतकर्‍यांची लूटच केली. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी एवढाच फरक.

इंग्रजांनी महसूलाची मालगुजारी पद्धत बंद करून रोख रकमेच्या स्वरुपात महसूल वसूल करण्याची नवी पद्धत सुरु केली. त्यामुळे ज्यांच्याकडे रोख रक्कम होती, असे लोक सावकार बनले. त्यांनी शेतकर्‍यांना छळले. महसुली पद्धतीतील बदल हा इंग्रजी राजवटीत शेतकर्‍यांना बसलेला सर्वात मोठा आघात होता. तंट्या भिल्ल किंवा वासुदेव बळवंत फळके यांची आंदोलने याच निर्णयाच्या विरोधात होती. प्रबोधनकारांनी का कुणास ठाऊक या विषयाला हात घातला नाही.

गोल्ड स्मिथच्या ‘डेझर्टेट व्हिलेज' या गाजलेल्या कवितेने या पुस्तकाची सुरुवात होते. औद्योगिकरणाने खेडी कशी उद्‌धवस्त होतात, हा या कवितेचा विषय. ही कविता प्रबोधनकारांनी मॅट्रिकला असताना शिकलेली. उद्‌ध्वस्त खेड्याबद्दलची अस्वस्थता त्यांच्या मनात घर करून होती. पुढच्या आयुष्यात त्यांना आपल्या देशातील खेड्यांची दुर्दशा पहायला मिळाली. या कवितेचा सूर धरूनच त्यांनी या पुस्तकाचा प्रपंच मांडला आहे.

प्रबोधनकारांच्या तारुण्यात मुंबईमध्ये औद्योगिकरण सुरु झाले होते. जगारासाठी शेतकर्‍यांचे थवेच्या थवे मुंबईत दाखल व्हायचे. या शेतकर्‍यांची अवस्था विपन्न होती. विस्थापित शेतकर्‍यांचे दुःख पाहून या संवेदनशील लेखकाचे काळीज फाटत होते. त्यामुळे त्यांना गोल्ड स्मिथची कविता भावली. इंग्रजांचे राज्य शेतकरी विरोधी होते म्हणून शेतकर्‍यांची दुर्दशा झाली. स्वातंत्र्यानंतर आलल्या काँग्रेस सरकारनेही शेतकरी विरोधी धोरणे राबविली म्हणून परिस्थिती अधिक बिकट झाली. स्वातंत्र्योत्तर काळातील माझ्यासारख्या शेतकरी आंदोलनातील कार्यकत्याला ज्यांनी शेती सोडली त्यांची प्रगती झाली व जे शेतीत अडकले ते मात्र दारिद्र्यात खितपत पडले, असे चित्र दिसत आहे.

‘बांडगुळ्या मध्यम वर्ग' या तिसर्‍या प्रकरणात मध्यमवर्ग कसा अनुत्पादक आहे आणि तो सर्वाधिक फायदे कसे लाटतो याची विस्तृत आणि मनाचा ठाव घेणारी चर्चा केली आहे. याच लेखात ते लिहितात,’ एवढे मोठे ‘लोकमान्य' बनविलेले टिळक! पण त्यांचीही तीच गत. त्यांच्या चळवळीही शहरी आणि भगतही शहरीच. चिरोल केसचा फास गळ्याला बसला, तेव्हा गोरगरीब शेतकर्‍यांच्या घासातला घास काढायला, शुद्ध भिक्षुकी थाटाने टिळकांचा जो मोटार दौडी नाटकी सौराज्य दौरा खेड्यापाड्यांतून झाला, तेवढाच काय तो त्यांचा आणि खेडवळ जनतेचा, जन्मातला पहिला आणि शेवटचा प्रसंग.' तथाकथित स्वातंत्र्याची चळवळ ही या बांडगूळ मध्यमवर्गाची आहे असा ते निष्कर्ष काढतात. या लेखात रविंद्रनाथ टागोर यांच्या लेखातील काही उतारे दिले आहेत. ते मुळापासूनच वाचायला हवेत.

महायुद्धापूर्वी आणि नंतर व जनार्दनाचा नवावतार, या लेखांनंतर ‘ब्राह्मणेत्तर चळवळीचा जमाखर्च' या शीर्षकाचा महत्त्वपूर्ण लेख येतो. महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा उलगडा व्हायचा असेल तर या चळवळीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. इंग्रज आमदनीच्या उत्तर काळात पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ही चळवळ झाली. या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी तिचे आकलन केले आहे. या चळवळीमुळे शेतकरी समाज कसा जागा झाला व ब्राह्मणी जोखडाला कसे झुगारले याचे मार्मिक विश्लेषण त्यांनी केले आहे. प्रबोधनकारांचे वैशिष्ट्य असे की, ते कायस्थ प्रभू जातीत जन्माला आले असले तरी त्या जातीचे दोष दाखविताना जराही संकोचत नाहीत. त्यांची लेखन शैली बोचरी, आक्रमक व पुष्कळदा प्रहार करणारी आहे. प्रतिभेचा वापर मानवी मूल्यांसाठी कसा करावा, याचे हे पुस्तक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच ब्राह्मणेत्तर चळवळीच्या बलस्थानाचे गुण गौरव ज्या जीवाभावाने ते करतात तेव्ढ्‌याच कठोरपणे या चळवळीत घुसलेल्या आलेल्या वाईट प्रवृत्तींवर प्रहार करतात. त्यांच्या लिखाणातील ही तटस्थता सत्याच्या अधिक जवळ नेते.

शेवटच्या लेखात त्यांनी शेती आणि शेतकर्‍यांचे महत्व स्पष्ट केले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी शेतकर्‍यांच्या समाजातील भूमिकेचे जे आकलन प्रबोधनकारांना झाले होते तेवढे आकलन स्वातंत्र्यानंतर झालेल्या शेतकरी आंदोलनातील कार्यकर्त्यांना झाले नाही. शेतकरी उद्धवस्त झाला तर सगळा समाज पंगू होतो. मूठभर लोकांची चंगळ होते. त्यांनी ‘भारत' आणि ‘इंडिया' हे शब्द वापरले नाहीत परंतु संपूर्ण विश्लेषण त्याच पद्धतीचे केले आहे. शेंतकर्‍याची भूमिका मध्यवर्ती स्वरुपाची आहे हे आग्रहपूर्वक मांडताना त्यांनी आपला राष्ट्रध्वज भगवा असावा व त्यावर नांगराचे चिन्ह असावे असे आग्रही प्रतिपादन केले आहे.

‘शेतकर्‍यांचे स्वराज्य' हेच आमच्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचे खरे स्वप्न होते. दुर्दैवाने ते साकार झाले नाही. गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले एवढाच काय तो फरक. प्रबोधनकारांना ही भिती स्वातंत्र्य आंदोलन चालू असतानाच वाटत होती. ती खरी ठरली. शेतकर्‍यांच्या मालाची कमी किंमत देऊन लूट होत राहिली. त्यांना चोहीबाजूने जयवंदी करण्यात आले. आज जेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागले आहेत. अशा काळात प्रबोधनकारांसारख्या माणसाची गरज तीव्रतेने जाणवते. प्रबोधनकार ठाकरे आज असते तर त्यांनी किती किती आणि कोठे कोठे आग लावली असती!