महाराष्ट्राचे शेलारमामा

आचार्य अत्रे

प्रबोधनकार आणि आचार्य अत्रे यांचे संबंध अत्यंत जीवाभावाचे. पण वाद झाले तेही टोकाचे. त्यांनी एकमेकांना जीवही लावला आणि जीणंही हराम केलं. अत्रेंनी प्रबोधनकारांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘मराठा’मध्ये लिहिलेला हा लेख म्हणून महत्त्वाचा आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या ‘महाभारता’मधले एक झुंझार महारथी केशवराव ठाकरे ह्यांच्या वयाला आज पाऊणशे वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या मंगल दिवशी मराठी जनतेकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा अभिषेक हाईल ह्यात काय शंका?

बावीस वर्षांपूर्वी त्यांच्या आकस्मिक मृत्यूची बनावट बातमी एका खोडसाळ माणसाने मुंबईच्या वृत्तपत्रात छापून आणली होती. त्यांसंबंधी खुलासा करताना केशवरावांनी त्या वेळी म्हटले होते, ‘महाराष्ट्राच्या सर्वक्षेत्रीय उत्कर्षाकांक्षेने वेडावलेला मी एक माथेफिरू मऱ्हाठा आहे. लांबलचक आयुष्याचा मी हावरा नाही. परंतु महाराष्ट्राची यावजन्म शक्य ती सेवा अखंड व्हावी ही मात्र इच्छा फार. माझा महाराष्ट्र माझ्या पाठीशी असो.’ ह्या उद्गारांत केशवरावांच्या जीवनाचे सारसर्वस्व प्रकट झाले आहे. ‘महाराष्ट्र’ म्हटला की फिरलेच त्यांचे माथे. फुगल्याच त्यांच्या शिरा. आवळल्याच त्यांच्या मुठी अन् कडाडलीच त्यांची वाणी नि लेखणी. जन्मभर महाराष्ट्रावर एवढे जाज्वल्य प्रेम करणारी ज्वलंत माणसे आज थोडी आढळतील.

मराठी जनतेच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ‘शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष’ स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी दोन तपांपूर्वी प्रतिपादलेली आहे. त्या लेखात ते म्हणतात, ‘महाराष्ट्राच्या मऱ्हाठा स्पिरिटला आवरणारा दमदार नेताच टिळकांच्या अन् शाहूमहाराजांच्या नंतर महाराष्ट्राला उरला नाही. अखिल महाराष्ट्राला आपलेपणाने पोटाशी धरून त्यांच्या नानाविध अडचणींता आणि आकांक्षांचा कडव्या मऱ्हाठी बाण्याने समन्वय करणारा नेता आज कोणीच नाही.

मऱ्हाठ्यांची जूट फोडण्याचे प्रयत्न गेली वीस वर्ष सारखे चालू आहेत. महाराष्ट्राचा मऱ्हाठा परप्रांतीयाचा सनातन गुलाम राहावा, त्याच्या श्रमाची भाकरी ऐन घासाच्या वेळी आपण गिळून गलेलठ्ठ व्हावे, त्यांच्यातल्या पुढा-यांचा त्यांच्याच हातून पाणउतारा करवावा आणि त्याला आपणच आपल्या दादागिरीच्या सौभाग्यासाठी निव्वळ ओझ्याचा बैल म्हणून राबवावा, अशा त-हेच्या कारवाया आणि कारस्थाने आज उघड्या माथ्याने चालू असूनही महाराष्ट्राचे डोळे उघडू नयेत ही मोठ्या दिलगिरीची गोष्ट आहे.’ भारताच्या राजकारणातून महाराष्ट्राला नेस्तनाबूत करण्यासाठी देशात चाललेल्या कारस्थानांची चाहूल दोन तपांपूर्वी ठाकरे ह्यांना लागली होती, ही त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष आहे. संयुक्त महाराष्ट्राची मागणी लाथाडून द्विभाषिक राज्य महाराष्ट्रावर जबरदस्तीने लादले गेले, ही त्याच कारस्थानाची परिणती होय. म्हणून भाषिक महाराष्ट्र-राज्य निर्माण करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती ’ चा जेव्हा अवतार झाला, तेव्हा ‘शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष’ स्थापन करण्याची आपली आकांशा अखेर साकार झाली ह्या समाधानाने ठाकरे हे ‘समिती ’ च्या झेंड्याखाली येऊन उभे राहिले.

ठाकरे ह्यांचे उभे आयुष्य सामाजिक आणि धार्मिक अन्यायाविरूद्ध बंडखोरी कऱण्यात आणि लढण्यात गेले. म्हणून त्यांच्या साठाव्या वाढदिवशी

‘नवयुग’मध्ये अभिनंदन करतांना आम्ही त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचे बंडखोर ‘ब्राह्मणेतर’ असा केला होता. विशेष इंग्रजी वा मराठी शिक्षण मिळाले नसतांनाही लहानपणापासून धर्मशास्त्राच्या नि समाजशास्त्राच्या अभ्यासाकडे त्यांचा ओढा होता. लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर ह्यांच्या मतांचा नि विचारांचा त्यांच्या मनावर विशेष पगडा बसला. जन्मजात विषमतेने आणि भिक्षुकी वर्गाच्या वर्चस्वाने हिंदुसमाजाच्या सामर्थ्याचा –हास झालेला आहे, ही गोष्ट त्यांच्या मनास विशेष जानवली. म्हणून ब्राह्मतेतर चळवळीत ते मोठ्या हिरीरीने दाखल झाले.

‘भिक्षुकशाहीचे बंड’ ह्या आपल्या ग्रंथात हिंदूंच्या सामाजिक संघटनेला विरोध करणाऱ्या भिक्षुकी सांप्रदायाचा धार्मिक नाठाळपणा त्यांनी मोठ्या आवेशाने चव्हाट्यावर मांडला आहे. ब्राह्मणेतर चळवळीच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना ‘प्रबोधन’ पत्र काढले. सतत पाच सहा वर्षे निरनिराळ्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर जळजळीत लेख लिहून महाराष्ट्रात त्यांनी खूप खळबळ केली आणि बहुजनसमाजाचे अक्षरश: ‘प्रबोधन’ केले. ब्राह्मणेतर चळवळ ही वर्गद्वेषाची विषारी चळवळ नसून समता प्रस्थापनेची एक लोकहितवादी चळवळ आहे, अशी त्या चळवळीसंबंधी ठाक-यांची शुद्ध आणि शास्त्रीय भूमिका होती. पुढे जेव्हा ह्या व्यापक समाजवादी चळवळीला विशिष्ट जातीच्या वर्चस्वप्रस्थापनेचे जातीयवादी आणि संधिसाधू स्वरूप प्राप्त होऊ लागले, तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीमधून त्यांनी आपले अंग सर्वस्वी काढून घेतले.

ठाकरे ह्यांच्या बंडखोर लेखनाचे आणि स्वभावाचे स्वरूप ‘भिक्षुकशाहीच्या बंडा ’त उघड होण्यापूर्वी ते ‘कोदंडाच्या टणत्कारात’त प्रथम प्रकट झाले होते. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी आपल्या एका संशोधनात कायस्थ प्रभू ज्ञातीची बदनामी करणारी काही विधाने केली होती. त्यांचा फडश्या पाडण्यासाठी ठाकरे ह्यांनी ‘कोदंडाचा टणत्कार ’ हे ज्वलजहाल पुस्तक लिहून महाराष्ट्रावर एक बॉम्बगोळाच टाकला म्हणानात. ह्या टणत्काराने निधड्या छातीचा लढवय्या लेखक आणि प्राणघातक प्रहार करणारा टीकाकार म्हणून ठाकरे ह्यांचे नाव प्रामुख्याने महाराष्ट्रापुढे आले. त्यांच्या लढाऊ कर्तृत्वाला येथून खरा प्रारंभ झाला.

वाङमयाच्या विविध दालनांतून ठाकरे ह्यांनी मोठ्या दिमाखाने संचार केलेला आहे. कोणाचीही भीडभाड न धरता मनात येईल ते छातीठोकपणे बोलायचे किंवा लिहावयाचे, मग जगाने काय वाटेल तो शंख केली तरी त्याची परवा करायची नाही, असा ठाक-यांचा पहिल्यापासूनच खाक्या असल्याने, त्यांनी काहीही लिहिले तरी त्यामुळे खळबळ माजावयाची हे समीकरणच मुळी ठरून गेले होते. त्यांच्या प्रत्येक शब्दावर आणि वाक्यावर त्यांच्या तडफदार, बाणेदार आणि लढाऊ व्यक्तिमत्त्वाचा ठणठणीत आणि खणखणीत ठसा उमटलेला आढळून येतो. त्यांचे जसे लिहिणे तसेच बोलणे. तमाशातले कडे जसे खणाण खणाण कडकडते, तसा त्यांच्या वकृत्वाला एक प्रकारचा विलक्षण नाद आहे. त्यांच्या जिभेचा पट्टा एकदा सुरू झाला म्हणजे मी मी म्हणणाऱ्या मर्दांना पळता भुई थोडी होते, आणि श्रोत्यांच्या हसता हसता मुरकुंड्या वळतात.

ठाक-यांच्या ह्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाला दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे. ती म्हणजे अखंड स्वाध्यायशीलतेची. त्यांचा विविध आणि मौलिक ग्रंथसंग्रह पाहिला म्हणजे त्यांच्या त्या तपस्वी वृत्तीची साक्ष पटते. महाराष्ट्राच्या इतिहासाचा त्यांचा व्यासंग जबर असून त्यांचा ‘रंगो बापूजी’ हा तेजस्वी ग्रंथ त्यांच्या अव्वल ऐतिहासिक संशोधनाचे चिरंतन स्मरण देत राहील. ऐतिहासिक काळापासून कायस्थ मंडळींनी महाराष्ट्रात लेखणी आणि तलवार सारख्याच कौशल्याने गाजविलेली आहे. ते लिहिण्याचे नि लढण्याचे आनुवंशिक शौर्य ठाकरे ह्यांच्या अंगी एकाच वेळी उतरलेले आहे. उभ्या आयुष्यात ते कोठल्याही पंथात वा पक्षात दाखल झालेले नाहीत. उलट त्या गोष्टीचा त्यांना मनस्वी तिटकारा आहे. जेवढे जेवढे उत्कट आणि भव्य दिसेल तेवढे घ्यावे आणि तेवढेच वाखाणावे, आणि त्याला जो विरोध करील, त्याला तिथल्या तिथेच प्रत्युत्तर द्यावे हा त्यांचा बाणा आहे.

त्यांच्या अंगातल्या ह्या सर्व उपजत गुणांचे उज्ज्वल स्वरूप संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रकर्षाने पाहावयास मिळाले. किंबहुना लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर ह्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातल्या बहुजनसमाजाला जागृत करण्याते जे महान कार्य सतत दोन तप ठाकरे ह्यांनी केले, ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी बजावलेल्या अविस्मरणीय कामगिरीने खचित सार्थकी लागले आहे. सत्तरी उलटली असतानाही शेलारमामाप्रमाणे ते साऱ्या महाराष्ट्रातून तळपत होते आणि शिवाजी पार्कवर एकसारखे गर्जत होते. महाराष्ट्रावरील त्यांच्या अपरंपार प्रेमाचा नि अथांग निष्ठेचा साक्षात्कार ह्या काळात हजारो लोकांना झाला.

अशा रीतीने महाराष्ट्राच्या उद्धारासाठी सारा जन्म आपला देह चंदनाप्रमाणे झिजवणारा हा वयोवृद्ध वीर महाराष्ट्रातील तरूणांना स्फूर्ती देण्यासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानाचा अंगार प्रज्वलित करण्यासाठी दीर्घायुष्मान होओ असे आम्ही इच्छितो.

मराठा : १७-९-१९६०